आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुणे विद्यापीठात सुरू हाेणार, असा असेल योग अभ्यासक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - बुधवारी साजऱ्या करण्यात आलेल्या  जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमा’ची घोषणा केली आहे. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे तो अल्प मुदतीचा आणि प्रात्यक्षिकप्रधान असेल आणि विद्यार्थ्यांना अर्धवेळ उत्पन्नाचे साधन त्यातून मिळवणे शक्य होईल.  
 
पुणे विद्यापीठाच्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण मंडळाचे अधिष्ठाता डॉ. दीपक माने यांनी ही माहिती दिली. विद्यापीठाच्या आरोग्य विभागांतर्गत अतिरिक्त कौशल्य म्हणून विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा फायदा मिळू शकेल, असे डॉ. माने म्हणाले. जुलै महिन्यात विद्यापीठाच्या  अकॅडमिक कौन्सिलची बैठक होणार आहे.  या बैठकीत योग अभ्यासक्रमाला मंजुरी मिळेल आणि प्रत्यक्ष अभ्यासक्रम ऑगस्ट २०१७ पासून सुरू होईल. हा अभ्यासक्रम अल्प मुदतीचा असेल. त्याचा कालावधी तीन महिन्यांचा असेल.  अभ्यासक्रमासाठी पहिले प्राधान्य विद्यापीठातील नियमित विद्यार्थ्यांना दिले जाईल. त्यानंतर जागा शिल्लक राहिल्यास बाहेरील व्यक्तींनाही तसेच विदेशी विद्यार्थ्यांनाही  प्रवेश मिळू शकेल.  या अभ्यासक्रमाचे शुल्क अद्याप निश्चित करण्यात आले नसले तरी ते विद्यापीठ शुल्क धोरणानुसार असेल. नियमित विद्यार्थ्यांसाठी पाच हजार, बाहेरील व्यक्तींसाठी दहा हजार याहून ते अधिक नसेल, असे डॉ. माने म्हणाले.  
 
असा असेल योग अभ्यासक्रम  
- तीन महिने मुदतीचा अभ्यासक्रम  
- नियमित विद्यार्थी, बाहेरच्या व्यक्ती, विदेशी व्यक्तींना प्रवेश  
- अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकावर सर्वाधिक भर  
- व्यावसायिक योग प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी  
- ऑगस्ट २०१७ पासून सुरू होणार  
- अभ्यासक्रमाची क्षमता ४० विद्यार्थी   
- विद्यापीठाचे  प्रमाणपत्र मिळणार  
- प्रथमोपचार, शरीरशास्त्राची माहिती, योगशास्त्राचा इतिहास, विविध आसनांचा अभ्यास व सराव, त्यातून होणारे फायदे, घ्यावयाची काळजी यांचा अभ्यासक्रमात समावेश
 
अल्प काळात उत्पन्नाचा स्रोत मिळणे शक्य
- परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा आणि थिअरी अशा त्रिविध स्तरावरील हा अभ्यासक्रम असेल. योग विषयाबद्दल विद्यार्थी आणि नागरिक यांच्यात जाणीवजागृती निर्माण व्हावी, हा उद्देश त्यामागे आहे. शिवाय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या  माध्यमातून अल्प काळात उत्पन्नाचा स्रोत मिळू शकेल. विद्यापीठाचे प्रमाणपत्र असल्याने विद्यार्थी बाहेर व्यावसायिकदृष्ट्या योगकौशल्याचा वापर करू शकतील.  
डॉ. दीपक माने, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण मंडळाचे अधिष्ठाता  
बातम्या आणखी आहेत...