आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचा निसटता विजय: ‘पुणे पदवीधर’चे चंद्रकांत पाटील, तर शिक्षकांचे दत्तात्रय सावंत आमदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी सलग दुसर्‍यांदा विजय मिळवला. तर शिक्षक कृती समितीच्या दत्तात्रय सावंत यांनी शिक्षक मतदारसंघातून बाजी मारली.

मंगळवारी सकाळी सुरू झालेली पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी बुधवारी पहाटे संपली. पहिल्या फेरीअखेरीस चंद्रकांत पाटील यांनी मिळवलेली थोडकी आघाडी शेवटपर्यंत टिकवली. पदवीधर मतदारसंघात 1 लाख 52 हजार 404 मते वैध ठरल्याने विजयासाठी 78 हजार 203 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. तो कोणत्याच उमेदवाराला पूर्ण करता आला नाही. त्यामुळे दुसर्‍या पसंतीची मतमोजणी करण्यात आली. यासाठी पंधरा फेर्‍या पार पडल्या.
पदवीधर मतदारसंघात भाजपच्या पाटील यांची लढत राष्ट्रवादीच्या सारंग पाटील यांच्याशी होती. सिक्कीमचे राज्यपाल आणि शरद पवार यांचे मित्र असलेल्या श्रीनिवास पाटील यांचा मुलगा सारंग उभा असल्याने ही निवडणूक ‘राष्ट्रवादी’ने प्रतिष्ठेची केली होती. शरद पवारांच्या सहीचे पत्र मतदारांपर्यंत पोचवण्यात आले होते. अजित पवारांनी जिल्हावार बैठका घेतल्या. परंतु राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे भाजपचा विजय सोपा झाला.

चंद्रकांत पाटील यांना 61 हजार 453 तर सारंग पाटील यांनी 59 हजार 73 मते मिळाली. बंडखोर उमेदवार अरुण लाड यांनी तब्बल 32 हजार 876 व शरद पाटील यांनी 8 हजार 519 मते मिळवल्याने भाजपला निसटता विजय मिळू शकला. शिक्षक मतदारसंघात दत्तात्रय सावंत यांनी 13 हजार 922 मते मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवार मोहन राजमाने यांच्यावर 1 हजार 529 मतांनी मात केली. राजमाने यांना 12 हजार 393 मते मिळाली.

भाजपतही गटबाजी
अंतर्गत गटबाजीमुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना विजयासाठी झगडावे लागले, अशी चर्चा भाजपच्या गोटात रंगली होती. पाटील दुसर्‍यांदा निवडून येऊ नये, अशी इच्छा असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या काही पदाधिकार्‍यांनी व आमदारांनी पाटील यांच्यासाठी काम केले नाही. पाटील हे तावडे गटाचे मानले जातात. प्रचाराची सूत्रे तावडे समर्थकांकडे गेल्यानेही अनेकजण निष्क्रीय राहिले. परंतु, संघ परिवाराशी पाटील यांचे घनिष्ट संबंध असल्यानेच त्यांना विजय मिळवता आला. संघ यंत्रणेने पाटील यांच्यासाठी प्रचार केल्यामुळे ते निवडून येऊ शकले, असे सूत्रांनी सांगितले.

छायाचित्र : विजयी उमेदवार चंद्रकांत पाटील.