आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मंगळवेढय़ात स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा - टाळ-मृदंग, खाद्यांवर भगवी पताका आणि मुखातून हरिनामाचा गजर करत पंढरीकडे जाणार्‍या दिंड्या मंगळवेढा येथील नागरिकांच्या जीवनमानात समरस झाल्या आहेत. या दिड्यांचे आगमन झाले की आषाढी एकादशीचे वेध लागतात. कर्नाटक व बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन महाराज पालखीसह छोट्या व मोठय़ा जवळपास 50 ते 60 दिंड्यांच्या माध्यमातून 60 ते 70 हजार भाविक पंढरीकडे जातात. आठ दिवस शहरातील वातावरण भक्तिमय होते.

जुलै महिना उजाडला की वेध लागतात ते पालखी सोहळ्याचे व वारीचे. मंगळवेढा येथून दामाजीपंतांच्या पालखीबरोबर कर्नाटकातून कानडा विठुरायाच्या दश्रनासाठी जाणार्‍या दिड्यांची संख्या जास्त आहे. आषाढी वारीला कर्नाटकातील वारकरी मोठय़ा संख्येने येतात. दररोज छोट्या-मोठय़ा दिंड्या या काळात शहरामध्ये दाखल होतात. ज्ञानोबा, तुकारामांचा गजर करीत शिस्तबद्ध पद्धतीने येणार्‍या या दिंड्या पालख्यांनी मंगळवेढा शहरात हर्षोल्हासात व भक्तिमय वातावरणात स्वागत केले जाते. ठिकठिकाणी दिंडीतील पालखीच्या स्वागताबरोबर अनेक जण चहा फराळ, जेवणाची व्यवस्था करतात. अनेक वर्षांची परंपरा आजही कायम आहे. 50 ते 60 दिंड्यांमधून 60 ते 70 हजार वारकरी पंढरीकडे मार्गस्थ होतात. अनेक जण नवस फेडण्यासाठी रस्त्यावरून लोटांगण घेत पंढरीकडे जात असल्याचे चित्र दिसते.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मंगळवेढय़ात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यामुळे संपूर्ण तालुक्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.