पालखी मार्गावरून - वेळ सकाळी नऊची. रिंगण सोहळ्यातील माउलीच्या अश्वांची छबी आपल्या डोळ्यात साठवण्याची वारकर्यांची लगबग सुरू. सूर्याने डोके वर काढल्याने थोडेसे ऊनही जाणवत होते. वाढत्या उन्हाची तमा न बाळगता माउलींचे गोड नाम मुखी घेत वारकरी रिंगण सोहळ्यात सहभागी झाले. एकीकडे रिंगण रंगू लागले अन् दुसरीकडे भक्तीचा मळा फुलू लागला. संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज माउलींचे तिसरे गोल रिंगण रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ठाकूरबुवांची समाधी येथे पार पडले. तहान-भूक हरपून वारकरी माउलींच्या जयघोषात तल्लीन झाले होते.
सकाळी साडेआठला माउलींच्या अश्वाचे, तर नऊ वाजून पाच मिनिटांनी माउलींच्या पालखीचे तळावर आगमन झाले. त्यानंतर माउलींचे स्मरण व स्वपणाचे विस्मरण वारकर्यांना घडत गेले. रिंगण लागल्यानंतर भोपळे दिंडीच्या पताकाधार्याने धावपट्टीवरून धावण्यास सुरुवात केली. 9 वाजून 20 मिनिटांनी माउलींचा अश्व धावण्यास सुरुवात झाली. माउलींच्या अश्वामागे स्वाराचा अश्व धावत होता. अश्वाने चार प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर रिंगण सोहळा पार पडला.
बबनराव पाचपुतेंनी काढली रांगोळी
रिंगण सोहळ्यापूर्वी धावपट्टीवर रांगोळी काढण्याची लगबग सुरू होती. माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी रिंगण मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालत माउलींची सेवा केली.
वारकरी आणि पोलिसांत धक्काबुक्की
पालख्या आणि दिंड्यांचे रिंगण स्थळावर आगमन होण्यापूर्वी वेळापूरच्या पुढे वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्नात पोलिस आणि वारकर्यांमध्ये बाचाबाची झाली. एका पोलिस कर्मचार्याकडून पालखी सोहळ्यातील एका जबाबदार पदाधिकार्याला धक्काबुक्की झाली. वारकर्यांनीही उपस्थित पोलिसांच्या अंगावर चाल करीत धक्काबुक्की केली. विश्वस्तांच्या मध्यस्थीने तणाव निवळला.
नंदाचा ओढा आटला, पण प्रेम नाही
वेळापूर ते पंढरपूर रस्त्यावर तोंडले आणि बोंडले गावांत नंदाचा ओढा नामक पाटावर माउलींच्या चरण पादुकांना स्नान घालण्यात येते. यंदा या पाटात पाणी नव्हते. ग्रामस्थांनी पाण्याची सोय केल्याने पादुकांना स्नान घालत प्रथा पूर्ण केली.
फोटो - माउलींच्या पालखीचा तिसरा रिंगण सोहळा ठाकूरबुवांची समाधी येथे पार पडला, रखरखत्या उन्हातही भाविकांची गर्दी