आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राजा हरिश्चंद्र’च्या बदल्यात मिळवला ‘देवदास’, बांगलादेशाशी वस्तुविनिमय पद्धतीने व्यवहार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - प्रख्यात लेखक शरच्चंद्र चटोपाध्याय यांच्या मूळ बंगाली कादंबरीवर आधारित ‘देवदास’ या मूळ चित्रपटाची प्रत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने थेट बांगलादेशकडून मिळवली आहे. अर्थात त्याबदल्यात बांगलादेशला पहिल्या भारतीय बोलपटाची ‘राजा हरिश्चंद्र’ची प्रतही देण्यात आली आहे. १९३५ सालच्या ‘देवदास’ची प्रत मिळवण्यासाठी तत्कालीन प्रचलित अशी वस्तुविनिमयाची पद्धत वापरण्यात आली आहे.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (एनएफएआय) संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती दिली. ‘गेल्या तीस वर्षांपासून देवदासची ही प्रत मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. ही ‘देवदास’ची पहिली प्रत मानली जाते. त्यामुळे ती ‘एनएफएआय’मध्ये असणे आवश्यक वाटत होते. बांगलादेशचे माहिती सचिव मुर्तझा अहमद आणि तेथील चित्रपट संग्रहालयाचे संचालक मोहंमद जहांगीर हुसेन यांनी एनएफएआयला भेट दिली. तेव्हा अनौपचारिक समारंभात ही ‘देवघेव’ करण्यात
आली, असे मगदूम म्हणाले.

देवदास येणार रसिकांसमोर
देवदास या कादंबरीवर बनलेले पाच चित्रपट सध्या ‘एनएफएआय’च्या संग्रहात आहेत. त्यात बंगाली, हिंदी (दाेन), तेलुगू, आसामी भाषांचा समावेश आहे. लवकरच ‘रिव्हिजिटेड देवदास’ असा महोत्सव आयोजित करून रसिकांना सर्व देवदास पाहण्याची संधी मिळेल, अशी माहिती संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली.
असा आहे देवदास
प्रथमेशचंद्र बारुआ यांचे दिग्दर्शन
बोलपटांतला हा पहिला देवदास
१९३५ मध्ये प्रदर्शित झाला
कालावधी : एक तास ३१ मिनिटे
बारुआ यांनीच निभावली देवदासची भूमिका
त्यांच्या पत्नी जमुना बारुआ यांनी केली पारोची भूमिका
चंद्रमुखी साकारली चंद्रवती देवींनी
बारुआ यांनी बंगालीसोबत आसामी, हिंदीतही देवदास केला
त्यापूर्वी १९२८ मध्ये देवदासवर मूकपटही बनला होता.
निगेटिव्ह मिळवू
बांगलादेशकडून मिळालेली मूळ बंगालीमधील ‘देवदास’ची ही प्रत डीव्हीडी स्वरूपातली आहे. चित्राचा दर्जा ठीक आहे. मात्र, मूळ निगेटिव्ह मिळवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत. बांगलादेशच्या चित्रपट संग्रहालयाला आपल्याकडे असणाऱ्या बंगाली चित्रपटांमध्ये रस आहे. त्यामुळे आगामी काळात देवघेव अाणखी वाढेल.
प्रकाश मगदूम, संचालक, एनएफएआय