आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Gadkari News In Marathi, Toll Free, Gopinath Munde

टोलमुक्तीचा मुंडेंकडे तोडगा, नितीन गडकरींकडून चिमटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘टोलबंद करणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाहीच. पण गोपीनाथ मुंडेसाहेबांसारखा अनुभवी नेता ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ असे म्हणतो तेव्हा नक्कीच त्यांच्या डोक्यात काही योजना असली पाहिजे,’ असा चिमटा भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी रविवारी पुण्यात काढला.

‘टोल धोरणाचे पितृत्व माझ्याकडेच येते परंतु राज्य सरकारच्या तिजोरीत पैसा नसल्याने मजबुरीने हे धोरण आम्हाला आणावे लागले होते. मात्र, या धोरणातली पारदर्शकता संपल्याने लोकांमध्ये टोलबद्दल संताप निर्माण झाला आहे,’ असे गडकरी यांनी स्पष्ट केले. पुणे र्शमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात ते बोलत होते. ते म्हणाले, की टोलमुक्ती द्यायची झाल्यास राज्य सरकारचे संपूर्ण बजेट कोलमडून पडेल. यापूर्वी झालेल्या करारांची पूर्तता करण्यासाठी पैसा कुठून आणायचा हा प्रश्न निर्माण होईल. मात्र मुंडेंसारखा अनुभवी नेता सांगतो तेव्हा त्यांच्याकडे नक्कीच त्यासाठी काहीतरी योजना असली पाहिजे. टोलमुक्ती कशी आणणार हे मुंडेंनाच विचारावे लागेल.

‘आप’ राजकारणातील तात्पुरता प्रवाह- ‘मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. माझ्या विश्वासार्हतेच्या जोरावर मी 4 हजार कोटी रुपये उभे केले. सरकारकडून पैसे उभारले. यातून 8 हजार कोटींची कामे केली. कोणाला काय करायचे असेल ते त्यांना खुशाल करू द्या. माझी यावर काहीच प्रतिक्रिया नाही,’ या शब्दात ‘आम आदमी पक्षा’चे नाव न घेता गडकरी यांनी टीका केली. ‘आप’ हा भारताच्या राजकारणातील एक तात्पुरता प्रवाह असून तो राजकारणातला पर्याय ठरू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो- ‘पवारसाहेबांचे एका गोष्टीचे मी कौतुक करतो. शेती, ग्रामीण भागाचे प्रश्न असतात तेव्हा पवार त्याबाबतीत पॉझिटिव्ह असतात. कोणीही काम घेऊन गेले तरी ते झाले पाहिजे असे त्यांना वाटते. राज ठाकरे माझे मित्र आहेत. उद्धव ठाकरेही आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा मी भक्त. मी विकासाचे राजकरण करतो. चांगले काम करणारा माणूस कोणत्याही पक्षात असला तरी त्याला मदत करण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र असत नाही,’ असे गडकरी म्हणाले. परंतु राष्ट्रवादी कॉँग्रेस किंवा मनसेशी सध्या कोणतीही सलगी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’- लोकसभा निवडणुकीसाठीचे भाजपचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. येत्या आठ मार्चला हे डॉक्युमेंट पक्षाला देणार असून सांसदीय समितीच्या मंजुरीनंतर ते जनतेपुढे येईल. करांच्या पुनर्रचनेवर यात भर दिल्याचे गडकरी म्हणाले. यातील प्रमुख मुद्दे असे :

* देशात सध्या 34 विविध कर आहेत. करांची ही संख्या 3 किंवा 4 वर आणण्याची सूचना केली आहे. यामुळे महागाईचा दर 25 टक्क्यांनी कमी होईल.
* देशात सध्या 17 लाख कोटींचा महसूल गोळा होतो. तो 25 लाख कोटींवर नेण्याचे उपाय सुचवले आहेत.