मुंबई- पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्रीपदी नव्हे तर साध्या ग्रामपंचायतीचे सरपंच होण्याच्या लायकीचे नाहीत. ते दिल्लीतून महाराष्ट्राचे वाटोळे करायलाच आले होते. त्यांना लकवा छाप मुख्यमंत्री अशी शरद पवार यांनी दिलेली उपमा खरी आहे. मात्र, निवडणूक आचारसंहितेपूर्वी त्यांचा हाताला मारलेला लकवा गायब झाला, अशी टीका केंद्रीय वाहतूक रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी चव्हाणांवर केली आहे. राष्ट्रवादी हा पक्ष विश्वसुंदरीसारखा आहे. विश्वसुंदरी जेव्हा स्टेजवर असते तेव्हा ती स्मितहास्य करीत सर्वांकडे पाहत असते. प्रत्येकाला वाटते ती
आपल्याकडेच पाहत आहे. पवारसाहेबांचेही तसेच आहे. प्रत्येकाला म्हणतात पुढच्या निवडणुकीत तूलाच तिकीट, तुलाच तिकीट. पण देत कोणालाच नाहीत. काळ्याची पांढरी झाली तरी त्यांनी प्रत्येकाल हसवत झुलवून ठेवले, अशी टीकाही राष्ट्रवादी व पवारांवर केली. नितीन गडकरींनी शरद पवारांवर प्रथमच अशी जहरी टीका केली आहे.
नितीन गडकरी मंगळवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहरात प्रचारासाठी आले होते. त्यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. गडकरी म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष देशातील सर्वात मोठे जातीयवादी पक्ष आहेत. या दोन पक्षांनी गेल्या 15 वर्षात महाराष्ट्राला केवळ लुटण्याचे काम केले आहे. पहिल्या क्रमांकावर असणारे राज्य आता सहाव्या क्रमांकावर गेले आहे. राज्यात वीज नाही त्यामुळे शेतकरी शेती करू शकत नाही. शरद पवार हे शेतकऱ्यांचे जाणते राजे. मात्र आज शेतकऱ्यांवर कंदील घेऊन फिरण्याची वेळ आली आहे. उद्योगांचे दिवाळे निघाले आहे. व्यापाऱ्यांना एलबीटी नको आहे. राज्याच्या विकासाला हातभार लावणारे सर्वजण त्रस्त असताना काँग्रेस व राष्ट्रवादी मात्र मस्त आहे. बापाचा माल समजून जनतेच्या पैशांची जितकी लूट करता येईल तितकी लूट करण्याचे काम या दोन्ही पक्षांनी केले, अशी टीका आघाडीतील पक्षांवर केली.
गडकरी पुढे म्हणाले, जोपर्यंत जनता बाबा, आबा आणि दादा यांच्या गाड्या भंगारात विकत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार नाही. देशात भाजपचे सरकार आल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीची सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष मुस्लिम समाजात सांप्रदायिकतेचे विष पेरण्याचे काम करत आहेत. आम्ही गेल्या चार महिन्यात मुस्लिम समाजाच्या विरोधात एकही निर्णय घेतलेला नाही. जात, पंथ व धर्मावर भाजपला कधीच राजकारण करायचे नाही. देशातील प्रत्येक नागरिकाला सामाजिक व आर्थिक न्याय देऊन सुखी व समृद्ध भारत निर्माण करण्याचे भाजपचे स्वप्न आहे. देशाचे भविष्य बदलायचे आहे. विकासाच्या बाबतीत भाजप भेदभाव करणार नाही. मात्र काँग्रेसमुक्त झाल्याशिवाय देशाचे भविष्य घडणार नाही, असेही गडकरींनी सांगितले.