आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीतून भाजपत अालेले काळजे पिंपरीच्या महापाैरपदी, उपमहापाैरपदी शैलजा माेरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या नितीन काळजे यांची, तर उपहापौरपदी भाजपच्या शैलजा मोरे यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. पिंपरी-चिंचवडच्या आजवरच्या इतिहासात भाजपकडे प्रथमच महापाैरपद अाले असून काळजे हे या शहराचे  २४ वे महापौर ठरले आहेत. ते यापूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ओबीसी आरक्षित जागेवर ते विजयी झाले.   

महापौरपदासाठी मंगळवारी सकाळी प्रक्रिया सुरू झाली. मात्र, पीठासीन अधिकाऱ्यांनी कामकाज सुरू करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्याम लांडे यांनी माघार घेतली. त्यामुळे काळजे महापौरपदी बिनविरोध निवडून आले. तसेच उपमहापौरपदासाठी निकिता कदम यांनी माघार घेतल्याने मोरे याही बिनविरोध निवडून आल्याची घोषणा पीठासीन अधिकारी दौलत देसाई यांनी केली. 

मुख्य म्हणजे पिंपरी- चिंचवड मनपा हद्दीत नव्याने सामील झालेल्या गावाचे प्रतिनिधित्व नितीन काळजे करत आहेत. महापौरपदी निवड झाल्यावर सर्व नगरसेवकांनी संत मोरया गोसावी यांचे दर्शन घेतले. मावळत्या महापौर शकुंतला धराडे यांनी महापौरपदाची सूत्रे काळजे यांच्याकडे सोपवली. पदभार स्वीकारल्यावर महापौर काळजे यांनी पालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब केली. 
   
महापौर काळजे हे ४२ वर्षांचे असून व्यवसायाने शेतकरी आहेत. ते अविवाहित असून वीट कारखाना, ट्रान्स्पोर्ट आणि बिल्डिंग मटेरियल सप्लाय असेही व्यवसाय करतात.    

महापौर आले बैलगाडीतून   
पिंपरी-चिंचवड मनपा ही सर्वांत श्रीमंत मनपा म्हणून ओळखली जाते. एरवी दिमाखदार मोटारींतून येणाऱ्या राजकारणी मंडळींची सवय या मनपा भवनाला आहे. भाजपचे नितीन काळजे महापौर झाल्यावर मात्र मूळचे शेतकरी असणाऱ्या काळजे यांनी बैलगाडीतून मनपात एंट्री घेतली. काळजे यांच्यासोबत पक्षाचे आमदार व अन्य नगरसेवक तसेच कार्यकर्ते होते. सर्वांनी केशरी फेटे परिधान केले होते. महापौर आणि उपमहापौर दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्यावर बैलगाडीतूनच काळजे आणि मोरे यांची मिरवणूक काढण्यात आली.   
बातम्या आणखी आहेत...