आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल पाण्याला मागणी जोरात, ‘टमाटेबाबा’ घरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कोणतीही वैद्यकीय पदवी नसलेल्या कोणा ‘नितीन महाराजां’च्या लाल पाण्याच्या प्रसादाने कोणतेही रोग-व्याधी कायमच्या ब-या होत असल्याच्या अंधश्रद्धेने गेल्या तीन वर्षांपासून जोर धरला होता. मात्र, या अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवणा-यांची संख्या वाढल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून नितीन महाराजांनी लाल पाण्याच्या ‘प्रसादा’चा ओघ आवरता घेत घरातच बसणे पसंत केले आहे. तरीही या प्रसादासाठी येणा-या अंधश्रद्धाळूंची गर्दी हटत नसल्याने महाराज चांगलेच हैराण झाले आहेत.

राहू पिंपळगाव (ता. दौंड) हे गाव काल-परवापर्यंत धड पुणे जिल्ह्यालाही माहिती नव्हते. आता या गावाची प्रसिद्धी महाराष्ट्रभर आणि शेजारच्या राज्यांतही झालीय. यासाठी निमित्त ठरले ते या गावातील फिरंगाई देवीचे जुने मंदिर आणि येथे बसणारे ‘नितीन महाराज’ ऊर्फ नितीन थोरात हा स्थानिक तरुण. कसलाही रोग असो की शारीरिक दुखणं, व्याधी असोत की जुनाट आजार, या सगळ्यावरचा रामबाण उपाय म्हणजे ‘नितीन महाराजां’कडून मिळणारा लाल पाण्याचा
प्रसाद. हा समज इतक्या वेगाने पसरला की गेल्या तीन वर्षांत नितीन लाखो जणांसाठी ‘देव’ ठरला.

लाल पाण्याच्या प्रसादाचे खूळ भलतेच वाढले आणि राहू पिंपळगाव या छोट्या गावात लाखोंची गर्दी जमू लागली. धनिक- गरीब, साक्षर- निरक्षर या सगळ्यांनी घोटभर लाल पाण्यासाठी नितीन महाराजांकडे रांगा लावल्या. नितीन टोमॅटोचे पाणी देत असल्याने कोणी त्याला ‘टमाटेबाबा’ही म्हणतात. सतत वाढणारी गर्दी आणि त्यातून निर्माण झालेले
लाखो रुपयांचे अर्थकारण काहींच्या डोळ्यावर आले आणि मग ‘नितीन महाराजा’च्या भोंदूपणाच्या चर्चेला तोंड फुटले.
लाल पाण्याच्या ‘प्रसादा'चाही प्रयोगशाळेत पंचनामा करण्याची मागणी पुढे आली. नितीन महाराजाकडे येणा-या शेकडो वाहनांच्या गर्दीमुळे राहू पिंपळगावचे ‘ट्रॅफिक जाम' होऊ लागल्याने साखर कारखान्यांकडून तक्रारी येऊ लागल्या. यामुळे नितीन थोरातने लाल पाण्याचा प्रसाद देणे सध्या थांबवले आहे. तरी त्याच्याकडे येणा-या भाविकांची गर्दी ओसरलेली
नाही. आता नितीनकडून फुकटचा प्रसाद मिळत नसल्याने काही श्रद्धाळू देवळाच्या परिसरातील माती अंगाला लावून घेऊ लागले आहेत. अंधश्रद्धेचे हे खूळ इतके वाढलेय की देवळाच्या परिसरात अनेक छोटे खड्डे दिसून येत आहेत. ‘प्रसादा'ची मागणी करणा-या श्रद्धाळूंचे थवे घरापर्यंत पोहोचू लागल्याने नितीन चांगलाच धास्तावला आहे.

महाराजाची कुळकथा
नितीन तुकाराम थोरात हा राहू पिंपळगावचा स्थानिक. ३७ वर्षांचा हा तरुण ग्रामपंचायत सदस्य आहे. व्यवसाय शेतीचा. भावासोबत तो तीन एकर उसाची शेती कसतो. भगवी वस्त्रे, रुद्राक्षांच्या माळा, वाढलेली दाढी-जटा हे नितीनचे रूप नाही. त्याचा शर्ट-पँट असा सहज पेहराव असताे. ‘महाराज’ कसा झाला याची कथा नितीननेे ‘दिव्य मराठी’ला सांगितली, ती
अशी – ‘गावाशेजारी वन खात्याची जमीन, डोंगर आहे. त्या डोंगरावर फिरंगाई देवीचं जुनं देऊळ आहे. ते दुर्लक्षितच होतं. कोणी जातही नव्हतं. एकांताचं ठिकाण म्हणून मी तीन- चार वर्षांपूर्वीपासून तिथं बसू लागलो. मी एकटाच डोंगरात कुठं जातो या उत्सुकतेतून माझ्यामागं काही लोकं येऊ लागले. हा ओघ वाढत गेला. देवळात येणारे लोक प्रसाद मागायचे म्हणून देवळाशेजारी उगवणारे गावठी टोमॅटो मी त्यांना देऊ लागलो.
कर्मधर्मसंयोगाने त्या प्रसादानं कोणाची दुखणी बरी झाली असतील. त्याची एवढी प्रसिद्धी झाली की देवळाकडे येणा-यांची गर्दी सतत वाढतच गेली. लोक मला महाराज म्हणू लागले.’

भोंदूगिरीपासून दूर राहावे
‘देवळात येणारे लोक प्रसाद मागायचे म्हणून मी टोमॅटोचा रस असलेले पाणी द्यायचो. या रसात औषधी किंवा दैवी गुण असल्याचा दावा मी कधी केला नाही. लोक मागत गेले, मी देत गेलो. हा ‘प्रसाद’ देणेसुद्धा मी आता पूर्ण बंद केले आहे. या प्रसादासाठी कोणीही राहू पिंपळगावला येऊन गर्दी करू नये. भोंदूगिरी, अंधश्रद्धेपासून लोकांनी दूर राहावे आणि माझीही बदनामी टाळावी.’
नितीन थोरात ऊर्फ नितीन महाराज

प्रसाद नव्हे, टोमॅटोचे पाणी
भाविकांना द्यायला डोंगरमाळावर प्रसाद कुठून आणणार, म्हणून नितीनने नैसर्गिकरीत्या उगवणारे गावठी टोमॅटो द्यायला सुरवात केली. गर्दी वाढल्याने टोमॅटो कमी पडू लागले. मग तो टोमॅटोचा रस काढून द्यायला लागला. तेही पुरेना. मग टोमॅटोच्या रसात पाणी मिसळून देऊ लागला. हा प्रसाद काही जणांना ‘लाभला’. त्याची चर्चा दूरवर पसरत गेली आणि
नितीन थोरात ‘टमाटेबाबा’ झाला. तक्रारीनंतर अन्न आणि औषध प्रशासनाने या प्रसादाची प्रयोगशाळेत तपासणी केली.तेव्हा या प्रसादात केवळ पाणी आणि टोमॅटो रसाचा अंश असल्याचे स्पष्ट झाले.

‘महाराज’पदाची भुरळ, गावाचे अर्थकारणच बदलले
तीन वर्षांपूर्वीपर्यंत सामान्य शेतक-याचे आयुष्य जगणारा नितीन ‘महाराज’ झाला. गावातल्या तरुणांनी ‘नितीन महाराज सेवा संस्था’ स्थापन करून नितीनला या संस्थेचे अध्यक्ष केले. या संस्थेची अधिकृत आर्थिक उलाढाल आता लाखोंच्या घरात आहे. नितीनच्या लाल पाण्याच्या ‘प्रसाद’ लोकांना फुकट वाटला जातो. परंतु, श्रद्धेपोटी भाविक स्वतःहून महाराजांपुढे खिसा रिकामा करतात. नितीनमुळे राहू पिंपळगावचे अर्थकारणही बदलून गेले आहे. महाराजांभोवतीचे स्वयंसेवक, वाहनचालक, पेट्रोल पंप मालक, हॉटेलचालक किरकोळ विक्रेते आदी सर्वांच्याच धंद्याला बरकत आली. स्वतःच्या पायाने चालत येणारी ‘लक्ष्मी’ आणि महाराजपदाची थोरवी यातून बाहेर पडणे आता नितीनलाही जड जातंय. नितीन महाराज स्वतः कसलाही दावा करत नाही, भाविकांकडे काही मागत नाही, मात्र आजवर त्याने ब-यापैकी कमाई केल्याचे सांगितले जाते. देवीच्या देवळातून तो बाहेर पडलाय...त्यामुळे आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा सरकारी प्रशासनालाही त्याच्यावर कारवाई करण्यात अडचणी येत आहेत.