आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Phule Is Not A Descendants Of Mahatma Phule\'s Family Neeta Hole

नितीन फुले हे महात्मा फुलेंचे वंशज नाहीत- निता होलेंचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्याजवळील मारुंजी येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिवशक्ती संगम कार्यक्रमात सहभागी झालेले नितीन फुले हे महात्मा फुले यांचे वंशज नाहीत असा दावा महात्मा फुलेंच्या थेट वंशज निता होले यांनी केला आहे. दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासन विभागाचे प्रमुख प्रा. हरी नरके यांनीही निता होले यांचा दावा खरा असल्याचे सांगत नितीन फुले हे महात्मा फुले यांचे थेट वंशज नसल्याचे म्हटले आहे.
मागच्या आठवडयात पुण्याजवळील मारुंजी येथे संघाचा भव्य शिवशक्ती संगमाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात नितीन फुले, त्यांचा 21 वर्षीय मुलगा रितेश फुले आणि नितीन यांचे चुलतबंधू दत्तात्रय फुले संघाच्या गणवेशात सहभागी झाले होते. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने देताना त्यात म्हटले होते की, महात्मा फुले यांचे वंशज नितीन फुले आपल्या बंधू व मुलासह संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. महात्मा फुलेंची ओळख एक बहुजन समाजाचे आद्य नेते, समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक अशी राहिली. त्यातही त्यांनी रूढी, परंपरा व मानवी जीवनात अडचणीच्या ठरणा-या प्रथा तोडण्याचे काम केले. त्याच फुलेंच्या वंशजांनी संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याचे वृत्त येताच सगळ्यांचे डोळे विस्फारले गेले.
यानंतर ही चर्चा सर्वच माध्यमांत झडू लागली. एका वृत्तवाहिनीने नितीन (नागेश) फुले व त्यांच्या कुटुंबियांची मुलाखत दाखवली. यानंतर महात्मा फुले यांच्या थेट वंशज असलेल्या निता होले यांनी याप्रकरणी पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच नितीन फुले व दत्तात्रय फुले हे महात्मा फुले यांचे थेट वंशज नसल्याचे मत मांडले. नितीन फुले हे आमच्या भावकीतील असून, आडनाव बंधू आहेत. मात्र, ते महात्मा फुलेंचे वंशज नाहीत. महात्मा फुलेंचे ते वंशज असते तर त्यांनी त्यांचे विचार आत्मसात केले असते व संघात हजेरी लावलीच नसती अशी टीका करीत महात्मा फुलेंचे वंशज म्हणून त्यांनी यापुढे सांगू नये अशी नाराजी निता होले यांनी व्यक्त केली.
नितीन फुले हे महात्मा फुलेंचे थोरले बंधू राजाराम फुले यांचे खापरपणतू आहेत. फुले कुटुंबातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी असलेले नितीन फुले संघाचे स्वयंसेवक आहेत. संघाशी कसा संबंध आला यावर नितीन यांनी सांगितले आहे की, आमच्या घराजवळ संघाची शाखा भरायची व तिचे नाव महात्मा फुले सायम् शाखा असे होते. बालपणापासून मी त्या शाखेमध्ये जात आहे. संघात जातपात मानली जात नाही. तेथे समरसता, बंधुता शिकवली जाते आणि संघाच्या दैनंदिन शाखेमधून नैतिक मूल्ये आपल्यामध्ये रुजल्याचे नितीन फुले यांनी सांगितले.
फुले दांम्पत्याला नव्हते मुलबाळ-
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दांम्पत्याला मुलबाळ नव्हते. समाजकार्याला वाहून घेतल्यानंतर या दांम्पत्याने एका ब्राम्हण परिवारातील यशवंत नावाचा मुलगा दत्तक (वारस) म्हणून घेतला होता. यशवंत हाच आपला वारसा चालवेल असे फुलेंनी लिहलेल्या मृत्यूपत्रात म्हटले आहे. मात्र, त्यासाठीही त्यांनी तीन अटी घातल्या होत्या. यशवंतने सत्यशोधक समाजाचे काम केले पाहिजे यासह चांगले वर्तन व इतर काही अटींचा समावेश होता. यशवंत यांनी महात्मा फुले यांचा वारसा जोपासला. निता होले या यशवंत यांच्या पणतू आहेत.
बंधू राजाराम यांच्याशी काहीही संबंध नाही-
फुले यांनी 25 सप्टेंबर 1887 रोजी आपल्या मृत्यूपत्राची कायदेशीर नोंद पुण्यातील रजिस्ट्रार कार्यलयात केली होती. त्यात म्हटले होते की, जो आपला वैचारिक वारसा चालवेल तोच आपला वारस असेल. माझा बंधू राजाराम व मी वेगळे राहतो. त्याचा माझ्या कार्याशी काहीही संबंध नाही, असे मृत्यूपत्रात लिहून ठेवल्याचे महात्मा फुले यांच्या विषयीचे अभ्यासक हरी नरके यांनी सांगितले.