आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाभोलकर हत्याकांड: 1200 जणांची चौकशी, अजून तपास सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 1200 जणांची चौकशी केली आहे. मात्र, अद्यापही मारेक-यांचा काही सुगावा लागला नाही. पोलिस महासंचालक संजीव दयाल यांनी खुनाच्या तपासाची आढावा बैठक शनिवारी घेतली. यात तपास पथकांची संख्या 19 करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे व तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी दिली.

भामरे म्हणाले, पोलिस महासंचालकांनी तपास पथकातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांची सुमारे अडीच तास बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी आतापर्यंत अधिका-यांनी कोणता व कशा प्रकारे तपास केला आहे याचा आढावा घेतला. तपासाची मोठी व्याप्ती पाहता सुमारे 200 पोलिसांचा समावेश असलेली 19 पथके निर्माण करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकास विविध कामांची विभागणी करून दिली असून त्यादृष्टीने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. दहशतवादविरोधी पथक, गुप्तचर खाते, विशेष शाखा व पुणे शहराबाहेरील काही पोलिसांचा तपास पथकात समावेश करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस याप्रकरणी स्वतंत्र तपास करत असून त्यांचाशीही पुणे पोलिस माहितीची देवाणघेवाण करत आहे.

तुरुंगातील कैद्यांकडे चौकशी
डॉ. दाभोलकर यांच्या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी स्थापन झालेल्या तपास पथकातील पोलिसांनी दैनंदिन कामकाज बाजूला ठेवून सर्व लक्ष खुनाचा उलगडा करण्यासाठी केंद्रित केले आहे. विविध स्थानिक ठिकाणचे गुंड, संशयित यांच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या एका पथकाने येरवडा मध्यवर्ती कारागृह व ठाणे येथील तळोजा कारागृहातील काही महत्त्वपूर्ण कैद्यांकडे या खुनाच्या तपासाबाबत चौकशी पूर्ण केली आहे.

‘साधना’ संपादकपदी शिरसाट
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर साधना साप्ताहिकाच्या संपादकपदाची जबाबदारी ‘साधना’चे याआधीचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाट यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

शनिवारी झालेल्या बैठकीत विश्वस्त मंडळाचे सदस्य प्रा. रा. ग. जाधव, मोहन धारिया यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. साधनाच्या विश्वस्तपदी डॉ. दाभोलकरांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांची निवड करण्यात आली. विश्वस्त असणा-या हमंत नाईकनवरे यांच्याकडे सचिवपद सोपवण्यात आले.

हत्या प्रकरणाचे यवतमाळ कनेक्शन
यवतमाळ । अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे यवतमाळ कनेक्शन असण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथील एका शार्पशूटरला दाभोलकर यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. गुप्तता म्हणून पोलिस याबाबत सावधगिरीने तपास करत आहेत. दरम्यान, 20 जुलै रोजी दाभोलकर यवतमाळच्या दौ-यावर होते. त्यानंतर एक महिन्यानंतर म्हणजे 20 आॅगस्ट रोजी त्यांची हत्या करण्यात आली.

जात पंचायतीवर पोलिसांचा वॉच
दाभोलकर हत्याकांडाचा तपास करणा-या पोलिसांची नजर जात पंचायतीवर असून राज्यातील सर्वच जात पंचायतींची माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.