आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Compramise On Water Issue, Sharad Pawar Remarks

पाण्याच्या प्रश्नावर कधीच तडजोड नाही,शरद पवार यांचे बारामतीत स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - ‘सिंचन प्रकल्पावर कितीही खर्च झाला तरी त्यावर टीका करण्याचे कारण नाही. प्रकल्पांना विलंब झाल्याने खर्च वाढत आहे. राज्याला दुष्काळातून बाहेर काढायचे असेल तर पाणी योजनांवर खर्च करणे आवश्यकच आहे,’ असे स्पष्टीकरण केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी दिले.
बारामती व पुरंदर तालुक्यांतील जानाई उपसा सिंचन प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. पवार मुख्यमंत्री असताना या योजनांना मंजुरी मिळाली होती. कार्यक्रमास जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, वारंवार दुष्काळी कामे काढणे, शेतक-यांना कर्ज माफी देणे यासारखे खर्च करण्यापेक्षा सिंचन, पाणी योजनांसाठी थोडा जादा निधी खर्च करणे राज्याच्या हिताचे आहे. मात्र उपसा सिंचन योजना वापरणा-या शेतक-यांनी त्याचे वीज बिल भरले नाही तर योजना कधीच यशस्वी होणार नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
कृषी खात्याचे वाभाडे
राज्याच्या कृषिमंत्रालयाने फळबागांसाठी योजना करून फळबाग विकासासाठी निधी देण्याचे आश्वासनही दिले. दुसरीकडे, केंद्राने दुष्काळात होरपळलेल्या राज्यातील फळबागा वाचवण्यासाठी निधी दिला, मात्र त्यातून फळबागा वाचवण्यास मदत झालेली दिसत नाही. शेतक-यांसाठी पाठवलेला पैसा तळापर्यंत आला नसेल, असा टोलाही पवारांनी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना लगावला. तसेच या प्रकाराकडे लक्ष देण्याची सूचना अजित पवारांना केली. अन्नसुरक्षेमुळे देशातील शेतक-यांचा फायदाच होणार असल्याचा दावा त्यांनी केला.