आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीच्या निकालात घोळ; मंडळाची चूक नसल्याचा विभागीय सचिवांचा निर्वाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - बारावीचा निकाल जाहीर होऊन दोन दिवस उलटले तरीही निकालाविषयीचे कवित्व अद्याप शिल्लक असल्याचे चित्र दिसत आहे. निकालात अंतिम मूल्यमापनात बोर्डाकडून घोळ घातल्याचा आरोप अनेक विद्यार्थी व पालकांनी केला असून शनिवारी मंडळाच्या विभागीय कार्यालयात त्यांनी याचा जाब विचारण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
बारावीचा निकाल जाहीर करताना बोर्डाने प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेचे गुण दिलेले नाहीत. कारण गुणपत्रिकेत ऑनलाइन दिसणारे एकत्रित गुण अपेक्षेपेक्षा फारच कमी आहेत, अशी बहुसंख्य विद्यार्थी आणि पालकांची तक्रार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आजवरचे शैक्षणिक यश वादातीत आहे, ज्यांना दहावी-अकरावीत 90 टक्क्यांहूनही अधिक गुण होते अशा विद्यार्थ्यांना यंदाच्या बारावीच्या परीक्षेत 60 ते 65 टक्के गुण मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांच्या मनात शंका येत आहेत.


बोर्डाचे गुण मूल्यमापन संशयास्पद आहे. पेपर तपासणीवर शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार तसेच इतर अनेक कारणांनी निकाल घाईघाईने जाहीर करण्याच्या नादात उत्तरपत्रिका व्यवस्थित तपासण्यात आल्या नसाव्यात किंवा अंतर्गत मूल्यमापनाचे गुण दिले गेले नसतील, असेच विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. बोर्डाच्या या कारभारामुळे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान होईल, अशी तक्रारही विद्यार्थ्यांनी केली.


बोर्ड गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत आहे आणि 99 टक्क्यांहूनही अधिक टक्के बोर्डाचे काम अचूक आहे, हे सिद्ध झाले आहे. निकालाचे काम अत्यंत गांभीर्याने आणि काटेकोरपणे केले जाते. विविध प्रकारचे फिल्टर प्रत्येक टप्प्यावर असतात. त्यामुळे बोर्डाची यामध्ये कोणतीही चूक नाही. महत्त्वाचा एक मुद्दा असा की, बदललेल्या अभ्यासक्रमाची ही पहिलीच परीक्षा होती. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सा-यांचाच स्वत:विषयीचा अंदाज चुकला आहे. पेपर्सची काठिण्य पातळीही चर्चेत आली होती. मात्र, तिथेही पुराव्यानिशी हे सिद्ध झाले होते की, पुस्तकाबाहेरचा कुठलाही प्रश्न विचारण्यात आला नसल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले.


मंडळाचा कारभार पारदर्शी आणि स्पष्ट
मंडळाची या प्रकरणात चूक नाही. विद्यार्थी आणि पालक विनाकारण तक्रारी करत आहेत. मंडळाचा कारभार अत्यंत पारदर्शी आणि स्पष्ट आहे. शनिवारी विद्यार्थी आणि पालकांच्या आग्रहाखातर आणि संशयाचे निराकरण व्हावे यासाठी 16 सँपल केस घेण्यात आल्या. त्यासाठी सर्वांची उपस्थिती होती. एका मुलीने केलेल्या तक्रारीनुसार तिच्या-पालकांच्या समोर तिचा लेखी पेपर, तिच्या शाळेने केलेल्या अंतर्गत मूल्यमापनाचा पेपर हे सर्व सर्वांसमोर ठेवण्यात आले. त्यामध्ये त्या मुलीला प्रात्यक्षिक परीक्षेत तिच्याच शाळेने शून्य गुण दिले आहेत. हाच प्रकार अन्य सँपल केसबाबतही घडला. पुष्पलता पवार, राज्य शिक्षण मंडळ विभागीय सचिव


सहा जूनला चित्र स्पष्ट
विद्यार्थ्यांना सहा जून रोजी आपापल्या शाळांमध्ये गुणपत्रिका मिळतील. त्यानंतर आवश्यकता वाटल्यास उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्सही दिल्या जातील. त्यामध्ये प्रत्येकाचे लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेचे मूळ गुण समजतील आणि कुठल्याही शंकेला वाव राहणार नाही, असेही बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले.