आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • No Objection On Lord Ganpati, Narendra Dabholkar Say His Last Press Note

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विरोध गणपतीला नाही; पर्यावरणपूरक उत्सव हवा, दाभोळकरांचा शेवटच्या पत्रकात आग्रह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी 20 ऑगस्टला पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठीची पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र, त्या दिवशीच्या सकाळीच त्यांची हत्या झाली. माध्यमांना देण्यासाठी डॉ. दाभोलकरांनी सही करून तयार ठेवलेले पत्रक अखेरचे ठरले. ‘जनजागृतीच्या माध्यमातून येत्या 3 ते 5 वर्षात संपूर्ण गणेशोत्सव हा विसर्जनाच्या दृष्टीने पर्यावरणपूरक होईल,’ हा विश्वास आणि ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीच्या उंचीबाबत शासनाने निर्णय घ्यावा,’ असा आग्रह त्यांनी या पत्रकात धरला आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष अविनाश पाटील, कार्यवाह मिलिंद देशमुख यांनी डॉ. दाभोलकरांची राहून गेलेली पत्रकार परिषद बुधवारी पुण्यात घेतली. या वेळी त्यांनी डॉ. दाभोलकरांच्या सहीचे पत्रक दिले. ‘‘प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) आणि विषारी-रासायनिक रंगांमुळे जलस्रोत प्रदूषित होतात. हे टाळण्यासाठी डॉ. दाभोलकर गेल्या वीस वर्षांपासून पाठपुरावा करत होते. त्यांचा विरोध गणपतीला नव्हता. पर्यावरणपूरक उत्सवासाठी ते आग्रही होते. कोणत्याही धार्मिक कारणांवरून जलस्रोतांचे प्रदूषण होऊ नये यासाठी अंनिस यापुढेही कार्यरत राहील,’ असे पाटील म्हणाले.


विरोध कशामुळे ?
गणेशोत्सवाच्या काळात राज्यात सुमारे दीड कोटी घरगुती गणपतींचे विसर्जन होते. सार्वजनिक गणपती मंडळांची संख्या सत्तर हजारांच्या घरात आहे. मध्यम ते मोठ्या आकारांच्या या कोट्यवधी मूर्तींमुळे जलाशयांमध्ये प्रचंड गाळ साठतो. जिवंत झरे बुजतात. जलचरांच्या कल्ल्यात प्लास्टर ऑफ पॅरिसचे (पीओपी) कण जाऊन त्यांचा मृत्यू होतो. मूर्तींवरच्या रासायनिक-विषारी रंगांमुळे पाणी प्रदूषण होते.


अंनिसने सुचवलेला उपाय
‘पीओपी’ऐवजी मातीच्या-शाडूच्या मूर्ती तयार करण्याचा उपाय योग्य आहे. मात्र दीड-दोन कोटी मूर्ती तयार करण्यासाठी माती मिळणार का, हा प्रश्न उद्भवू शकतो. औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेने मातीला पर्याय म्हणून कागदाचा पर्याय पुढे आणला आहे. महिनाभराच्या वृत्तपत्रांच्या लगद्यापासून चांगली मूर्ती घरच्या घरी तयार करता येईल. कागदाचा लगदा मातीत मिसळणारा असल्याने ही मूर्ती पर्यावरणपूरक असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे. डॉ. दाभोलकर यांनी दिलेल्या मार्गावर यापुढेही चालत राहून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला जाईल, असा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला.


नागपूर-साता-याचे अनुकरण
नागपूर महापालिकेने कृत्रिम जलाशयातील मूर्तींची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे राजपत्राद्वारे जाहीर केले आहे. त्यामुळे नागपुरातल्या कोणत्याही जलाशयात प्लास्टर ऑफ पॅरिसचीच नव्हे तर मातीची कोणतीही मूर्ती विसर्जित करता येणार नाही. महापालिकेच्या कृत्रिम जलाशयातच विसर्जन करावे लागेल. ही बाब संवेदनशील आहे. भाजपने यात पुढाकार घेतल्याने ती इतरत्र अनुकरणीय ठरणे सोपे जाईल. सातारा नगरपालिकेनेही असाच ठराव एकमताने केला. त्याचबरोबर विषारी रासायनिक रंगाने रंगविलेल्या मूर्तीच्या विक्रीवर शहरात बंदी घातली.