आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरणिका पदाधिका-यांच्या छायाचित्रांविनाच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - घुमानला झालेल्या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेतून दरवर्षी आढळणारी साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांची छायाचित्रे यंदा मात्र ‘गायब’ आहेत. संमेलन महामंडळाचे असते, असे उच्चरवाने सांगणा-या महामंडळ पदाधिका-यांचे स्वत:च्या छायाचित्रांबाबतचे ‘मौन’ सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

घुमान येथे साहित्य संमेलन घेण्यावरून महामंडळ सुरुवातीला वादात सापडले होते. प्रत्यक्षात पंजाब सरकारच्या कृपेने हे संमेलन यशस्वी झाले. दरवर्षीप्रमाणे संमेलनाची स्मरणिका प्रकाशित झाली. प्रथेनुसार स्मरणिकेत सुरुवातीला साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांची माहिती व छायाचित्रे देण्याची पद्धत आहे. यंदाच्या ‘अभिजात’ शीर्षकाच्या स्मरणिकेत पृष्ठक्रमांक २ ते ११ पर्यंत विविध राजकीय मंडळींची छायाचित्रे व शुभेच्छा संदेश छापले आहेत, पण त्यात एकही साहित्यिक नाही. तसेच संमेलन ज्या महामंडळाचे असते, त्या महामंडळाच्या एकाही पदाधिका-याची माहिती वा छायाचित्र स्मरणिकेत नाही.

यांची आहेत छायाचित्रे
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पंजाबचे मंत्री विक्रमसिंग मजीठिया यांची छायाचित्रे व शुभेच्छा संदेश स्वतंत्र पानांवर छापण्यासाठी १० पाने खर्ची घातली आहेत. निमंत्रक स्वागताध्यक्ष भारत देसडला आणि आयोजक सरहद संस्थेचे संजय नहार तसेच स्मरणिकेचे संपादक सदा डुंबरे यांचेही छायाचित्रांसह मनोगत या स्मरणिकेत आहे. स्मरणिकेत डाव्या पानावर एका कॉलमात फक्त महामंडळ पदाधिकारी व सदस्यांची यादी छापली आहे.

आशय महत्त्वाचा
स्मरणिकेचा आशय महत्त्वाचा असतो. त्यामध्ये पानेच्या पाने समित्यांचे पदाधिकारी, सदस्य यांच्यासाठी खर्ची घालण्याची पद्धत बंद करावी, कारण त्यात औचित्य नाही. शुभेच्छा संदेश घेणे व छापणेही बंद करावे, असे वाटते. महामंडळ पदाधिका-यांना हे पटले आणि त्यांनी स्वत:ची छायाचित्रे वा माहिती देणे टाळले.
सदा डुंबरे, स्मरणिका संपादक

छायाचित्रांबाबत आग्रही नाही
दरवर्षी महामंडळ पदाधिका-यांची छायाचित्रे स्मरणिकेत असतात, पण यंदा आम्हीच एकमताने छायाचित्रे नसावीत, असे ठरवले. छायाचित्रांबाबत कुणीही आग्रही राहिले नाही. त्यातून इतर अर्थ काढू नयेत.
डॉ. माधवी वैद्य, अध्यक्षा, साहित्य महामंडळ