आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मान्सूनचे पहिले दान कोरडेच जाणार! महाराष्ट्रातील पावसाला कुठूनच मिळेना बळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांनी (मान्सून) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरी पावसाचा पहिला महिना कोरडाच जाणार असल्याची चिन्हे आहेत. पावसाला बळ देणारे कोणतेच हवामान बदल अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात घडत नाहीत. येत्या आठवडाभरात या स्थितीत बदल होण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे जूनमध्ये पुरेसा पाऊस मिळण्याची शक्यता दुरापास्त झाली आहे.

पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले की, वार्‍यांची बदलणारी दिशा, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण, ढगांमधील बाष्प, तापमानातील चढ-उतार इत्यादी घटकांवरून मान्सूनच्या आगमनाची वर्दी दिली जाते. याच घटकांचा आधार घेऊन संपूर्ण राज्यात मान्सून पोहोचला असल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले. पाऊस आणि मान्सून हे घट्ट समीकरण असले तरी मान्सूनकाळात प्रत्येक वेळी पाऊस पडतोच असे नसते. सध्याची स्थिती नेमकी अशीच आहे. मान्सून आला असला तरी पाऊस आलेला नाही. कारण मान्सूनला बळ देणारे हवामान बदल घडताना दिसत नाहीत.

मान्सूनची वाट बिकट
मान्सूनची पुढची वाटचालदेखील बिकट असल्याचे अंदाज मिळू लागले आहेत. पॅसिफिक समुद्रातील ‘एल निनो’ हा सागरी प्रवाहांचा घटक सध्या तरी न्यूट्रल आहे. परंतु मान्सूनवर मोठा परिणाम करण्याची ताकद असणारा हा घटक पुढच्या काही महिन्यांत विकसित होण्याची शक्यता 70 टक्क्यांपर्यंत आहे. एल निनो विकसित झाल्यास मान्सूनला मोठा फटका बसण्याची भीती आहे. पॅसिफिक समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून चक्राकार वार्‍यांचीही निर्मिती होऊ लागली आहे. त्यामुळे मान्सून आणखी क्षीण होऊ शकतो.

सर्वत्र कोरडेपणाच
या पार्श्वभूमीवर कोकण, सह्याद्री रांगा या परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय. उर्वरित राज्यात काही ठिकाणी तुरळक ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासांत कोकण, गोव्याचा अपवाद वगळता राज्याचा बहुतांश भाग कोरडाच होता. कोकणातदेखील एकाही ठिकाणी दहा मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला नाही.

नान्योकने दिला फटका
‘जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अरबी समुद्राच्या पश्चिमेला तयार झालेल्या नान्योक चक्रीवादळामुळे भरात येऊ पाहणार्‍या मान्सूनचा जोर ओसरला. नान्योकने पहिल्याच टप्प्यात मान्सूनमध्ये जोरदार अडथळे आणले. त्यातून मान्सून अजून पूर्वपदावर येऊ शकलेला नाही. मान्सूनला चालना देणारा कोणताच हवामान बदल अरबी समुद्रात अस्तित्वात नाही. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झालेली नाही.’
डॉ. मेधा खोले, उपमहासंचालक , आयएमडी