आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन होत नसल्याने विकासाला खीळ बसेल, मात्र शासनास याची जाणीव नाही - मोदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘एकविसावे शतक आशियाचे असल्याची चर्चा आहे, पण चीन बाजी मारणार की भारत याचा निर्णय अजून व्हायचा आहे. निरंतर संशोधन आणि कौशल्य विकासाच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून न दिल्यास भारताच्या विकासाला खीळ बसेल. दिल्लीतल्या सरकारला याची जाणीव नसल्याने देशात निराशजनक वातावरण आहे,’ अशी टीका गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली.


फर्ग्युसन महाविद्यालयातील अ‍ॅम्फी थिएटरच्या नूतनीकरणाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यानंतर ते विद्यार्थ्यांसमोर बोलत होते. ते म्हणाले, की ‘पाश्चात्यांचे अंधानुकरण न करता आधुनिकीकरण आणणारी शिक्षण व्यवस्था भारताला हवी आहे. परंतु, स्वातंत्र्यानंतर शिक्षण व्यवस्थेला आकार देण्याची भूमिका सरकारने निभावली नाही. चीन जीडीपीच्या 20 टक्के खर्च शिक्षणावर करतो. आपण 4 टक्क्यांवरच अडखळतो आहोत. जगातल्या सर्वोत्तम पाचशे विद्यापीठांमध्ये चीनची 38 तर भारताचे एकच विद्यापीठ आहे. देशात गुणवत्तेची कमतरता नाही. पस्तीशीच्या आत वय असलेली 65 टक्के लोकसंख्या असलेला भारत तरुणांचा देश आहे. ही तरुण पिढी देशातल्या समस्यांबद्दल गंभीर आहे. फक्त त्यांचे बोट धरुन चालण्याची गरज असल्याचे मोदी यांनी नमूद केले.


सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विकास काकतकर, कायर्वाह श्रीकृष्ण कानेटकर, ‘फर्ग्युसन’चे प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी यावेळी उपस्थित होते.


मनी मेकिंग शिक्षण
स्वातंत्र्यानंतर शिक्षणव्यवस्था सुधारण्याचे प्रयत्न सरकार पातळीवरुन झाले नसल्याची टीका मोदी यांनी केली. ते म्हणाले, की 1835 मध्ये बंगाल शंभर टक्के साक्षर होता. स्वातंत्र्यानंतर भारताच्या महान शिक्षण परंपरेला उजाळा दिला असता तर आज देश फार पुढे निघून गेला असता, परंतु माणसे घडवणारी (मॅन मेकिंग) शिक्षणव्यवस्था आणण्याऐवजी सरकारने शिक्षणाला बाजारू (मनी मेकिंग) स्वरुप मिळवून दिले.


भारताचे नाक कापले
दक्षिण कोरियासारखा छोटा देश ऑलिम्पिकचे यशस्वीरीत्या आयोजन करतो, त्यात काही पदकेही मिळवतो. आपला देश मात्र 120 कोटींचा असूनही पदकाविना धडपडत राहतो. एखादेच पदक मिळाले तर आपण तेच छातीवर घेऊन मिरवत राहतो. आपल्या देशाला राष्‍ट्रकुलसारख्या छोट्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला तर त्यातही भ्रष्टाचार करून काही लोकांनी देशाचे नाक कापले, असा टोलाही मोदींनी खासदार सुरेश कलमाडी यांनी लगावला.


अलोट गर्दी, मोदींचे विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन
मोदी यांच्या तासभराच्या भाषणाला विद्यार्थ्यांनी अनेकदा टाळ्यांचा कडकडाट करुन प्रतिसाद दिला. अ‍ॅम्फी थिएटरबाहेरही स्क्रीनवर भाषण ऐकण्यासाठी असंख्य विद्यार्थी जमले होते. भाषणानंतर मोदींनी सुरक्षा बाजूला ठेवत बाहेरील विद्यार्थ्यांचीही आवर्जुन भेट घेतली. त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती.