आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Non Defeated Mass Leader Sharad Pawar Filed Application For Rajyasabha Election

अपराजित लोकनेता शरद पवार दरबारी राजकारणात,राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सन 1967 पासून गेली 47 वर्षे सलगपणे लोकांमधून निवडून येणारे लोकनेते व राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही आता राज्यसभेच्या माध्यमातून वयाच्या 74 व्या वर्षी प्रथमच देशाच्या दरबारी राजकारणात प्रवेश करत आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेत सहा वेळा आणि लोकसभेत सात वेळा विक्रमी जनमताच्या पाठिंब्यावर निवडून गेलेल्या पवारांनी आजवर एकदाही पराभव पाहिलेला नाही.
मतदारांना जिंकण्यात कायम यशस्वी झालेले पवार ‘लोकांमधून निवडून न येऊ शकणा-यांची’, ‘मागच्या दाराने येणा-यांची’ नेहमीच खिल्ली उडवत आले आहेत. त्यांच्या या शैलीचा फटका सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून भाजप नेते प्रमोद महाजन, नितीन गडकरी यांच्यापर्यंत अनेकांना बसलाय. मात्र, दरबारी राजकारण्यांना टोले लगावणा-या याच पवारांना यापूर्वी एकदा विधान परिषदेचा मार्ग पत्करावा लागला होता. 1992 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर देशाचे संरक्षणमंत्रिपद सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी ते परतले तेव्हा ते विधान परिषदेतून निवडून गेले.
वास्तविक 2009 मध्येच राज्यसभेवर जाण्याचा मनोदय पवारांनी बोलून दाखवला होता. नंतर त्यांनी माढ्यातून लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी बारामतीत पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले होते, ‘या वेळी लोकसभेत जायचे नाही, असा माझा पक्का मनोदय होता. निवडणुकीच्या झंझटीत पडण्यापेक्षा राज्यसभेत जाऊन काम करण्याची इच्छा होती. परंतु, पक्षाच्या तीस-चाळीस ज्येष्ठ नेत्यांनी माझ्या उमेदवारीचा निर्णय घेतला. नवा मतदारसंघ आहे. बघू काय होतं ते?,’ अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी त्या वेळी केली होती. प्रत्यक्षात ते 3 लाख 14 हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले. लोकांमधून मिळवलेला हा पवारांचा आता शेवटचा विजय ठरणार आहे.
लोकप्रियतेच्या बळावर
० पुण्याच्या बीएमसीसी कॉलेजमधला ‘युवक नेता शरद पवार’ वयाच्या 24 व्या वर्षी राज्य युवक काँग्रेसचा अध्यक्ष झाला.
० 1967 मध्ये बारामतीतून पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा शरद पवार हे 27 वर्षांचे होते. तिशी ओलांडेपर्यंत ते वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले.
० 1972, 1977 व 1978 मध्ये त्यांनी आमदारकीची हॅट्ट्रिक केली. वयाच्या 38 व्या वर्षी सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री झाले. त्यांचा हा विक्रम अजून तरी राज्यात कोणी मोडलेला नाही.
० इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसने 1984 मध्ये महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48 पैकी 43 जागा जिंकल्या, तर बारामतीसह पाच ठिकाणी काँग्रेस पराभूत झाली. या वेळी बारामतीमधून समाजवादी काँग्रेसच्या तिकिटावर पवार पहिल्यांदाच खासदार झाले. पुढे 1991, 1996, 1998, 1999, 2004 मध्ये बारामतीतून आणि 2009 मध्ये माढ्यातून पवार लोकसभेत गेले.
देशातील ‘लोकनेते’
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते दिवंगत ज्योती बसू सलग 23 वर्षांहून अधिक काळ पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. हा राष्ट्रीय विक्रम आहे. 1946 ते 1996 या कालावधीत त्यांनी बारा निवडणुका लढवल्या आणि सर्व जिंकल्या. 1996 मध्ये देशाचे पंतप्रधानपद बसू यांच्याकडे चालून आले; मात्र कम्युनिस्ट पार्टीच्या (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरोने त्यास अनुमती दिली नाही.
जवाहरलाल नेहरूंच्या शब्दांत ‘भारताचा भावी पंतप्रधान’ किंवा डॉ. मनमोहनसिंगांच्या शब्दातले ‘भारतीय राजकारणातले भीष्म पितामह’ अटलबिहारी वाजपेयी 1957 ते 2004 या काळात दहा वेळा लोकसभेवर निवडून गेले. विशेष म्हणजे त्यांनी अनेकदा मतदारसंघ बदलला. दीर्घकाळ पंतप्रधानपद भूषवणारे बिगरकाँग्रेसी नेते होण्याचा मान त्यांनी मिळवला.
‘राजस्थान का एकही सिंह’ अशी ओळख असणारे भैरवसिंह शेखावत 1952 ते 2002 या काळात अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले. तीन वेळा ते राजस्थानचे मुख्यमंत्री होते. 2002 मध्ये ते उपराष्ट्रपती झाले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत 2007 मध्ये प्रतिभा पाटील यांच्याविरुद्ध आयुष्यातला पहिला पराभव स्वीकारला, तेव्हा ते ८4 वर्षांचे होते.
पत्रकार, पटकथालेखक म्हणून कारकीर्द सुरू करणारे एम. करुणानिधी हे सी. अण्णादुराई यांच्या निधनानंतर ‘डीएमके’चे सर्वेसर्वा बनले. तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद पाच वेळा भूषवणा-या एम. करुणानिधी यांनी 1957 पासून 2011 पर्यंत सलग बारा निवडणुका लढवल्या. या सर्व निवडणुका विक्रमी मताधिक्याने जिंकण्याचा विक्रम त्यांनी केलाय.