आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमराठी सरकारी बाबूंसाठी मराठीचा वर्ग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - केंद्रीय सरकारी कार्यालयात अनेकदा अमराठी माणसे कनिष्ठ वा वरिष्ठ पदावर कार्यरत असतात. मात्र, त्यांना मराठी फारसे अवगत नसल्याने सामान्य नागरिकांना त्यांच्याशी संवाद साधण्यात, त्यांच्याकडून दैनंदिन कामे करून घेण्यात अनंत अडचणी येत असतात. हे प्रकार टाळण्यासाठी आता मे महिन्यापासून अमराठी सरकारी बाबूंसाठी खास मराठीचा वर्ग सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा वर्ग ऑनलाइनसुद्धा चालणार आहे.
राज्य मराठी विकास संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक सोलनकर यांनी दिली. अमराठी सरकारी बाबूंना मराठीचे धडे देताना ते विभागवार देण्यात येतील. त्याची सुरवात रेल्वे विभागापासून होणार आहे. या विभागातील शंभर अमराठी मंडळींना मराठी भाषेचे धडे पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहेत, असे सोलनकर यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या अनेक विभागांची मुख्य, मध्यवर्ती कार्यालये मुंबई, पुणे तसेच राज्याच्या अन्य भागातही आहेत. तेथे अनेक अमराठी अधिकारी तसेच कर्मचारी नियुक्त आहेत. राज्याच्या सर्व शासकीय विभागातले कामकाज मराठी भाषेत होत असल्याने अमराठी मंडळींची अनेकदा पंचाईत होते. कामकाजात अडथळेही निर्माण होतात. या मंडळींना इंग्रजी किंवा हिंदी भाषा येतात, पण त्या त्या विभागातल्या प्रत्येक मराठी व्यक्तीचे या भाषांवर प्रभुत्व असतेच असे नाही. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी राज्य मराठी विकास संस्था प्रयत्न करणार आहे. अल्प मुदतीचा असला तरी हा प्रशिक्षण वर्ग अमराठी मंडळींसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास डॉ. सोलनकर यांनी व्यक्त केला.

रेल्वेपासून सुरुवात
^मराठीप्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या टप्प्यात रेल्वे विभागातील अमराठी कर्मचारी असतील. तीन महिन्यांचा वर्ग असेल. आठवड्यातले दोन दिवस वर्ग चालेल. ज्या मंडळींना प्रत्यक्ष वर्गात येणे जमणार नाही, त्यांच्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षणही देणार आहोत. डॉ.अशोक सोलनकर, अध्यक्ष, राज्य मराठी विकास संस्था
बातम्या आणखी आहेत...