बारामती - काश्मीरमधील धुमश्चक्रीवर पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच तडाखेबंद प्रत्युत्तर दिले. सीमेवर गोळीबार होतो तेव्हा त्याचे उत्तर नेते देत नाहीत, तर जवान बंदुकांनी देतात. आमचे जवान हे काम चोखपणे बजावत आहेत, अशा शब्दांत मोदी यांनी
आपल्यावरील टीकेला बारामती येथील सभेत उत्तर दिले.
विरोधकांना उद्देशून मोदी म्हणाले, ‘हा विषय राजकीय चर्चेचा नाही. राजकीय फायद्यासाठी सीमेवर तैनात जवानांचे मनोबल खच्ची करू नका.’ राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सीमेवरील परिस्थितीवरून मोदींवर टीकेची तोफ डागली होती.
काळ बदलल्याची जाणीव शत्रूलाही झाली
काळ बदलला आहे याची जाणीव शत्रूला झाली आहे. त्यांच्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. जेव्हा जवान बोलतात तेव्हा ते ट्रिगरवरील बोटांनीच बोलतात... ते बोलतच राहतील. आज सीमेवर गोळ्या चालत आहेत आणि शत्रूच्या किंकाळ्या फुटत आहेत. आमचे जवान धैर्याने उत्तर देत आहेत.
- नरेंद्र मोदी, (बारामती येथील सभेत)
शरद पवार यांना लाज वाटायला हवी
सीमेवर रक्त सांडणा-या जवानांचे नीतिधैर्य खच्ची होईल, असे राजकारण करणा-या शरद पवारांना शरम वाटली पाहिजे. निवडणुका येतील आणि जातील, परंतु सीमेवरील हल्ल्यांचा उपयोग राजकारणासाठी करू नका,” असा हल्ला मोदी यांनी केला. पवारांना लक्ष्य करताना ते म्हणाले, महाराष्ट्रात अतिरेकी हल्ले झाले. मुंबई, पुणे, मालेगावात स्फोट झाले; परंतु त्याचे आम्ही राजकारण केले नाही. संरक्षणमंत्री असताना पवार कधी सीमेवर गेले होते का? असा सवालही त्यांनी केला. पवार काका- पुतण्यांची गुलामी झुगारा, असे आवाहन मोदी यांनी केले.