आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Anywhere Compromise, Raj Thakare Give Ultimatem To Party People

नको तिथे सलगी कराल तर याद राखा, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना भरला दम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शहराच्या व नागरिकांच्या विकासकामांच्या संदर्भात अन्य पक्षांचे सहकार्य घेणे अथवा सहकार्य देणे एकवेळ चालेल; पण अन्य कुठल्याही प्रकारची सलगी इतरांशी कराल तर याद राखा, मी अशा प्रकारांची गंभीर दखल घेऊन थेट कारवाई करेन. गटबाजी वाढताना दिसते आहे..ती वेळीच आवरा..असा सज्जड दम राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना येथे भरला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौ-यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी राज्यभरातील पदाधिका-यांची झाडाझडती घेतल्यावर शनिवारी पुण्यातील मनसे नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड मागवून त्यांनी सा-यांची व्यक्तिश: भेट घेत प्रत्येकाला खास ठाकरे स्टाइलने झापले, असे सूत्रांनी सांगितले.
शहरातील विकासकामे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कामांसाठी तुम्हाला जनतेने नगरसेवक म्हणून निवडले आहे. त्या कामांना तुमचे प्राधान्य असले पाहिजे. विकासकामे करताना अन्य राजकीय पक्षांचे सहकार्य घेणे वा देणे एकवेळ मी चालवून घेईन, मात्र अन्य कुठल्याही प्रकारची सलगी मला खपणार नाही, असे खडे बोल राज यांनी या वेळी सुनावले.
पक्षात स्थानिक पातळीवर गटबाजी वाढताना दिसते आहे, याचीही दखल मी घेतली असून यापुढे असले प्रकार चालणार नाहीत. सुरुवातीला आपले आठ नगरसेवक निवडून आले, तेव्हा आपण चांगले काम केले होते. म्हणून पुढच्या वेळेला आपल्या 28 नगरसेवकांचे बळ लोकांनी दिले. त्यामुळे अधिक चांगल्या कामाची जबाबदारी होती. पण प्रत्यक्षात चित्र वेगळे दिसत आहे. मला हे चालणार नाही, अशा शब्दांत ठाकरे यांनी नगरसेवकांना दम भरला. मला कुठल्याही परिस्थितीत गुणवत्तापूर्ण कामे दिसली पाहिजेत. तुमच्या कामात नागरिकांचा थेट सहभाग असला पाहिजे, असेही ते म्हणाले.