आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यांची तुलना कशाला करताय? देशच मागे राहतोय..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘देशातील 40 टक्के बालके कमी वजनाची तर 30 टक्के प्रौढ कुपोषित आहेत. 70 टक्के बालके व महिला अँनेमिक आहेत. कुपोषित व गरिबीत आपण र्शीलंका, पाकिस्तान, बांगलादेशाला मागे टाकले आहे. असे असताना अमुक राज्य पुढे की मागे या चर्चेत काय अर्थ आहे? जागतिक पातळीवर पीछेहाट होत असताना देश म्हणून विचार व्हायला हवा,’ असे मत बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे कृषी सल्लागार डॉ. मंगला राय यांनी व्यक्त केले.
आघारकर संशोधन संस्थेच्या 53 व्या प्रा. शं. पु. आघारकर स्मृती व्याख्यानात सोमवारी ते बोलत होते. महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सचे अध्यक्ष डॉ. कल्याण बॅनर्जी अध्यक्षस्थानी होते.
‘जगाच्या लोकसंख्येपैकी 17 टक्के लोक आणि एकूण प्राण्यांपैकी 11 टक्के प्राणी भारतात आहेत. तर जगातील एकूण गोड पाण्यापैकी 4.2 टक्के पाणी आणि एकूण जमिनीपैकी फक्त 2.4 टक्के जमीन आपल्या देशात आहे. त्यामुळे भारतीय जमिनीवरचा बोजा जागतिक सरासरीपेक्षा पाच-सहापट जास्त आहे. दिवसेंदिवस जमीन, पाणी कमी होत असताना अन्नसुरक्षेचे आव्हान अधिक बिकट होत आहे,’ याकडेही डॉ. राय यांनी लक्ष वेधले.
‘अन्नसुरक्षे’ला बळ नाही
सरकारने अन्नसुरक्षा कायदा लागू केला. या कायद्याला बळ देणारी स्थिती मात्र देशात नाही. दरमहा दरडोई सात किलो धान्य पुरवण्याची तरतूद कायद्यात आहे. या हिशेबाने किमान 65 दशलक्ष टन धान्य साठवावे लागेल. देशातील गोदामांची क्षमता 58 दशलक्ष टनांपेक्षा जास्त धान्य साठवण्याची नाही, याकडे डॉ. राय यांनी लक्ष वेधले.
शेतीव्यवसाय तोट्या
‘शेतमालाचे दर वाढत असताना शेतकर्‍यांना मात्र किफायत दाम मिळत नाही. ग्राहक देत असलेल्या किमतीचा एक तृतीयांश वाटासुद्धा शेतकर्‍यांना मिळत नाही. शेती दिवसेंदिवस तोट्याची होऊ लागल्याने शेतकर्‍यांचा आत्मविश्वास हरवतो आहे. ही स्थिती कायम राहिल्यास देशाची अन्नसुरक्षा धोक्यात येईल,’ असे डॉ. रॉय म्हणाले.
शेती केंद्रस्थानी हवी
अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया आदी देश ‘जीडीपी’च्या 4 ते 6 टक्के शेती विकास व संशोधनावर खर्च करतात. आपला शेतीवरचा खर्च गेल्या 65 वर्षांत जीडीपीच्या 0.6 टक्क्यांपुढे गेला नाही. देशातील 50 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या अवलंबून असलेल्या शेतीव्यवसायातील गुंतवणूक आणि संशोधन न वाढल्यास विषमता, अस्थैर्य, अशांतता वाढेल.’’ डॉ. मंगला राय, माजी महासंचालक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद