आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Having Teacher, 80 Percent Seat Vacant In State

शाळांची मास्तरकी नकोशी! , राज्यातील डीटीएडच्या 80 टक्के जागा रिक्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कधीकाळी उभ्या गावाचे आदरस्थान असलेल्या ‘शाळा मास्तरकी’च्या चाकरीचे आकर्षण आता पुरते ओसरले आहे. डीटीएड (डिप्लोमा इन एज्युकेशन) अभ्यासक्रमाच्या राज्यात 90 हजार जागा आहेत. यातल्या सुमारे 80 टक्के म्हणजे 70 हजारांहून अधिक जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात 25 हजार प्रवेश अर्जांची विक्री झाली आहे. मात्र यातल्या 19 हजार 500 विद्यार्थ्यांनीच अर्ज भरून दिले आहेत. यंदा 27 मे ते 2 जून या कालावधीत अर्ज विक्री सुरू होती. विद्यार्थ्यांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे अर्ज विक्रीची तारीख 15 जूनपर्यंत वाढवण्यात आली. येत्या 15 जुलैपर्यंत डीटीएड महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवल्याने ‘भावी शिक्षकां’चे वर्गही रिकामेच राहणार आहेत.


डीटीएडकडे येणा-या विद्यार्थ्यांचा ओघ आटल्याने महाविद्यालये ओस पडली आहेत. एकेकाळी डोनेशन घेऊन प्रवेश देणा-या संस्थाचालकांचे मात्र त्यामुळे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.


नोकरी मिळत नसल्याने उमेदवारांनी मार्गच बदलला
25 हजार अर्जांची राज्यात विक्री
19 हजार 500 अर्ज दाखल
70 हजार रिक्त जागा (सुमारे)
90 हजार राज्यातील एकूण जागा


महाविद्यालयांचे बेसुमार पीक
‘डीटीएड’ करून बाहेर पडणा-या शिक्षकांना सामावून घेण्याची क्षमता राज्यातील शाळांमध्ये नाही. सध्या राज्यात 1405 डीटीएड महाविद्यालये आहेत. यातील बाराशे महाविद्यालये विनाअनुदानित आहेत. राज्य शासनाने कोणतेही नियोजन वा अभ्यास न करता मागेल त्याला ही महाविद्यालये उघडण्याची परवानगी दिल्याने डीएडधारकांवर बेकारीची वेळ आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गांवर ‘डीटीएड’धारक शिक्षकांची नेमणूक होते.


‘दुकाने’ बंद करण्याची तयारी
शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने आजवर राज्यातील 32 संस्थाचालकांनी अभ्यासक्रम बंद करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे अर्ज केले आहेत.


नुसतीच पदवी; नोकरी मिळेना
‘सन 2000 नंतर डीएड झालेले विद्यार्थी प्रचंड संख्येने बाहेर पडले. या सर्वांना सामावून घेता येईल एवढ्या प्रमाणात नोक-या उपलब्ध झाल्या नाहीत. सध्या राज्यात सुमारे चार ते पाच लाख एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार नोक-यांच्या प्रतीक्षेत आहेत.हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळण्याची शाश्वती उरलेली नाही. येत्या एक-दोन वर्षांतही नोक-या मिळतील असे वाटत नाही. त्यामुळेच या अभ्यासक्रमाकडे येणा-या विद्यार्थ्यांचा ओघ आटला आहे.’ एन. के. जरग, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद.