आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Neccessary Outside Candidate, Say Manikrao Thakare

बाहेरच्या उमेदवाराची काँग्रेसला गरज नाही, माणिकराव ठाकरे यांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘लोकसभा निवडणुकीसाठी बाहेरच्या उमेदवाराची कॉंग्रेसला गरज नाही. अनेक सक्षम उमेदवार पक्षाकडे आहेत. त्यामुळे त्याविषयीची चर्चा नको’, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. कॉँग्रेस पक्षात नेतृत्वाविषयी कुठलेही मतभेद नाहीत, असाही निर्वाळा त्यांनी दिला.
कॉँग्रेसचे राष्‍ट्रीय सरचिटणीस खासदार युवराज राहुल गांधी 24 आणि 25 सप्टेंबरला महाराष्ट्र दौ-यावर येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. कॉंग्रेसने देश व राज्यभरात केलेली चांगली कामगिरी गेल्या काही दिवसांतील पोटनिवडणुकांमधील निकालांवरून स्पष्ट झाली आहे. पक्ष जनमानसात रुजल्याचे हे लक्षण आहे. आगामी निवडणुकीसाठी पक्षात अनेक सक्षम उमेदवार असल्याने बाहेरच्यांची आवश्यकताच नाही. जे पक्षात आहेत, पक्षासाठीच कार्यरत आहेत, त्यांचा विचार केला जाईल, असे विधान ठाकरे यांनी खासदार सुरेश कलमाडी यांचा नामोल्लेख टाळत केले.


सुरेश कलमाडीबाबत मौन
पुण्याच्या राजकीय पटलावरची सुरेश कलमाडी यांची आजवरची भक्कम पकड पाहता, राहुल गांधी यांच्या दौ-याचे निमंत्रण कलमाडी यांनाही पाठवले आहे का, या प्रश्नावर ठाकरे यांनी मौन बाळगले. पक्षातील सर्वांना निमंत्रित केले आहे, असा केवळ सूचक उल्लेख त्यांनी केला.


राष्‍ट्रवादीची 22 जागांची मागणी कोणत्या आधारे ?
राष्ट्रवादीने लोकसभेसाठी 22 जागा कुठल्या आधारावर मागितल्या आहेत, हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. 2009 मध्ये परस्पर समन्वयानेच तेव्हा जागांचे सूत्र ठरले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्ष 22 जागांची मागणी कुठल्या तर्कसंगतीने करत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे ठाकरे म्हणाले.


पोलिसांनाच विश्वास नसेल तर...!
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला एक महिना उलटूनही अद्याप मारेक-यांचा सुगावा पोलिसांना लागलेला नाही. तपास विविध पातळींवर आहे. मात्र पुणे पोलिसांनाच तपासाविषयी साशंकता वाटत असेल, तर त्यांनी गृह मंत्रालयाला तसे कळवल्यास अन्य तपासयंत्रणांचा विचार करता येईल, असे ठाकरे म्हणाले.


राहुल 24 ला नागपुरात, 25 ला पुण्यात
राहुल गांधी 24 सप्टेंबरला नागपुरात तर 25 ला पुण्यात येतील. नागपूर येथे विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील तर पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी ते चर्चा करतील. त्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे.