आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलनाध्यक्षपदासाठी सध्या उत्सुक नाही : गणेश देवी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘भाषा संशोधनाच्या विविध उपक्रमांमध्ये मी स्वत:ला गुंतवून घेतले आहे. त्यामुळे पुढील चार वर्षे तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मी उत्सुक नाही. सध्याचे प्रकल्प पूर्णत्वास गेल्यावर २०२० नंतर माझे नाव बिनविरोध निवडले गेले, तर मी हे बहुमानाचे पद स्वीकारेन’, अशी भावना ज्येष्ठ भाषासंशोधक डॉ. गणेश देवी यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

डोंबिवली येथे आगामी ९० वे साहित्य संमेलन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संमेलनाच्या अध्यक्षपदाची चर्चाही सुरू झाली आहे. साहित्य महामंडळाने अध्यक्षपद निवडणुकीचा कार्यक्रमही नुकताच जाहीर केला आहे. भाषाक्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संशोधनात्मक कार्य आणि योगदान तसेच सामाजिक क्षेत्रातील लक्षणीय योगदान असणाऱ्या डॉ. देवी यांचे नाव अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध लेखक राजन खान यांनी सुचवले होते. त्यावर डॉ. देवी यांनी हे मत मांडले आहे.

‘यूनेस्कोने जगभरातील सर्व भाषांच्या संख्यात्मक संशोधनाचे काम माझ्यावर सोपवले आहे. ही जबाबदारी मी नुकतीच स्वीकारली आहे. या कामासाठी मला केवळ राज्यभरातच नव्हे तर स्पेन, फ्रान्स, नायजेरिया आदी देशांमध्ये राहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत संमेलन अध्यक्षपदासाठीचा उमेदवार मी नाही. मी स्वीकारलेल्या कामांसाठी मला तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे २०२० पर्यंत तरी मी अध्यक्षपदासाठी उत्सुक नाही,’ असे देवी म्हणाले.

भविष्यातही सन्मान बिनविराेधच मिळावा
‘संमेलनाच्या अध्यक्षपदी चांगले काम करणाऱ्यांची बिनविरोध निवड व्हावी असा विचार राजन खान यांच्याशी चर्चेदरम्यान पुढे आला होता. घुमानच्या संमेलनातही आमची या विषयावर चर्चा झाली होती. ही कल्पना उत्तमच असल्याचे मी सांगितले होते. पण सध्याच्या जबाबदाऱ्या पाहता मला लगेचच ही जबाबदारी स्वीकारता येणार नाही. आणि पुढेही हे पद बिनविरोध माझ्याकडे आले, तर तो मी माझा बहुमान समजेन, असे डॉ. देवी यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...