आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Airservice From Pune To Sharja, Gulf Countries Travellers Not Assend In Mumbai

पुण्यातून शारजाला विमानसेवा,आखाती देशांमधील प्रवाशांना मुंबईत उतरण्‍याचे बंधन नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आखाती देशांमधील भाविकांना आता शिर्डी, शनिशिंगणापूरच्या दर्शनासाठी मुंबईत उतरण्याचे बंधन राहणार नाही. स्पाइसजेट कंपनीने शनिवारपासून पुणे-शारजा थेट विमानसेवेची घोषणा केली आहे. ही सेवा आठवड्यातील चार दिवस असेल, अशी माहिती कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष व्ही. राजा यांनी दिली. तसेच पुणे ते चेन्नई अशी विमानसेवा दररोज सुरू करत असल्याचेही राजा यांनी सांगितले.


आखाती देशांतून नगर जिल्ह्यातील शिर्डी तसेच शनिशिंगणापूरला दर्शनासाठी वारंवार येणा-या भक्तांची संख्या लाखांच्या घरात आहे. या भाविकांना यापूर्वी शिर्डी वा शनिशिंगणापूरला येण्यासाठी मुंबईत उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे किमान तीन दिवस प्रवासात जात असत. मात्र, आता शारजा - पुणे थेट विमानसेवा उपलब्ध झाल्याने लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. शिर्डी आणि शनिशिंगणापूर ही तीर्थस्थाने पुण्यापासून अवघ्या अडीच तासांवर आहेत. त्यामुळे पुण्यात उतरून थेट दर्शनाला जाणे भाविकांना सोयीचे ठरणार आहे. येत्या काही दिवसांत पुण्याहून थेट बँकॉकलाही विमानसेवा सुरू करण्यात येईल, असेही राजा यांनी स्पष्ट केले. सध्या लखनऊ आणि वाराणसी या दोन शहरांतून शारजाला थेट विमानसेवा आहे. त्यात आता पुण्याची भर पडली आहे. भविष्यात मालवाहतूक सेवा देण्याचाही कंपनीचा विचार आहे.


अशी असेल विमानसेवा
दुपारी 12.25 ला पुण्यातून उड्डाण
शारजातून पहाटे 1.25 वाजता परतीचे विमान उड्डाण करेल
पुण्यात सकाळी सहा वाजता लँडिंग
दोन आठवडे तिकीट दर 6499 रुपये
बोइंग 737-800 हे विमान वापरणार
प्रवासी आसनक्षमता 189