आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरच्या घरी ईसीजी, राहुलच्या संशोधनाला पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- स्वत: अव्वल दर्जाचे संशोधक असणाऱ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या डॉ. रघुनाथ माशेलकरांनी आपल्या मातोश्रींच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू केलेला युवा संशोधकांच्या नव्या आणि समाजोपयोगी संशोधनाला दाद देणारा पुरस्कार यंदा राहुल रस्तोगी या संशोधकाने मिळवला. राहुलने तयार केलेले ‘संकेत’ नावाचे उपकरण ‘माशेलकर पुरस्कारा’चे मानकरी ठरले अाहे.

नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने अंजनीबाई माशेलकर स्मृती पुरस्कार प्रदान केला जातो. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समाजोपयोगी असे कुठल्याही क्षेत्रातील नवे संशोधन, त्यातील कल्पकता, ताजेपणा, सुलभता, ते परवडणे..आदी मुद्दे विचारात घेतले जातात, असे डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले. छोट्या कार्डच्या आकाराचे हे उपकरण राहुलने विकसित केले. त्याला मोबाइल अॅप्स आणि क्लाऊडची जोड दिली. उपकरणात सेन्सर्स असल्याने ईसीजी व हृदयाची तपासणीही करू शकते. सध्या याची किंमत १५ हजार रुपये असली तरी ते दहा हजार रुपयांत करण्याचा राहुलचा संकल्प आहे.

शर्करा, रक्तदाब मोजणारे उपकरण तयार करणार
संकेत उपकरणाचा पुढचा टप्पाही विकसित करणार आहे. त्यातील यंत्रणेला रक्तदाब मोजणी, रक्तातील साखरेचे प्रमाण, शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, या घटकांची जोड देण्याचा प्रयत्न राहील. हे उपकरण देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीतील आरोग्य सेवकापाशी असावे, असे वाटते.

- राहुल रस्तोगी, युवा संशाेधक
अंजनीबाई माशेलकर स्मृती पुरस्कार स्वीकारताना राहुल रस्तोगी. याप्रसंगी (डावीकडून) डॉ. रघुनाथ माशेलकर, वैशाली माशेलकर, डॉ. अनिल गुप्ता, जयंत उमराणीकर

असे आहे ‘संकेत’
- पाकिटात मावेल असे छोट्या आकाराचे उपकरण.
- रुग्णांना घरच्या घरी ईसीजी काढता येतो.
- मोबाइलवरून फंक्शनिंग करणे शक्य होते.
- ईसीजी लगेच मेसेज, व्हॉट्सअॅप वा मेल करून डॉक्टरांकडे पाठवणे शक्य.
- थंब इम्प्रेशनने अवघ्या १५ सेकंदांत ईसीजी शक्य.