आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Environmentalist Opposing Pimpri Chinchwad Sahitya Sammelan

साहित्य संमेलनाला आता पर्यावरणवाद्यांकडूनही विरोध, थर्माकोल वापराने नाराजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Fact Placeholder
पुणे - वादविवाद, आंदोलने, संघर्षाशिवाय साहित्य संमेलन पार पडत नाही, याचा प्रत्यय देत आता पर्यावरणवादी मंडळींनीही संमेलनाविरोधात दंड थोपटले आहेत. पर्यावरणविषयक प्रश्नांविषयी काम करणाऱ्या वकील मंडळींनी संमेलनातील थर्माकोलच्या प्रचंड सजावटीला आक्षेप घेतला असून निषेधाची निवेदने व पत्रे पाठवली आहेत.

संमेलनाच्या सजावटीचा एक भाग म्हणून मान्यवर साहित्यिकांचे थर्माकोलचे प्रचंड पुतळे उभारण्यात येत आहेत. मुंबईचे कलाकार अमन विधाते व त्यांचे ५० सहकारी यासाठी काम करत आहेत. पर्यावरणाला अत्यंत घातक आणि निसर्गाला कायमस्वरूपी गंभीर इजा व हानी पोहोचवणाऱ्या थर्माकोलचा वापर अयोग्य आहे.

थर्माकोलमुळे विषारी वायूचे उत्सर्जन
थर्माकोलमध्ये घातक थर्माप्लास्टिकचे मिश्रण पॉलिस्टिरेन असते. या रासायनिक घटकांचे विघटन अत्यंत विलंबाने सुरू होते. थर्माकोलमुळे जमीन खराब व निरुत्पादक होते. थर्माकोल जाळण्यात येतो तेव्हा विषारी वायू उत्सर्जित होतो. त्यामुळे प्राणवायू प्रदूषित करणाऱ्या, जमिनीला धोका उत्पन्न करणाऱ्या थर्माकोलचा वापर केला जाऊ नये, अशी विनंती पत्र व निवेदनाद्वारे पर्यावरणविषयक कार्य करणाऱ्या वकिलांनी केली आहे. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, नियोजित संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्याजवळ निषेध नोंदवण्यात आला आहे.

थर्माकोल घातक
साहित्य संमेलनाचा पर्यावरणाशी जणू संबंधच नाही, अशा पद्धतीने सजावटीचे काम सुरू आहे. थर्माकोल पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत घातक आहे. त्यामुळे थर्माकोलच्या वापराविषयी आमच्या भावना संबंधितांपर्यंत पोहोचवत आहोत.
अॅड. असीम सरोदे, पर्यावरणविषयक वकील