आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्थिक व्यवहारांसाठी आता मराठीतही वाणिज्य कोश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- वाणिज्य विषयाच्या सर्व मूलभूत संज्ञांचे सर्वलक्ष्यी आकलन करून देणारा मराठीतील वाणिज्यकोशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुण्याच्या डायमंड पब्लिकेशन्सतर्फे साकारला आहे. एकूण पाच खंडांत या कोशाची विभागणी करण्यात आली आहे. डॉ. संजय कप्तान आणि प्रा. जॉन्सन बोर्जेस यांनी या खंडांचे संपादन केले असून पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी प्रस्तावना लिहिली आहे.


डायमंड प्रकाशनचे दत्तात्रय पाष्टे यांनी ही माहिती दिली. पाच खंडांच्या या कोशात सुमारे साडेतीन हजार पृष्ठे आहेत. कोशाच्या स्वरूपाविषयी ते म्हणाले, निव्वळ वाणिज्यविषयक संज्ञांचे मराठी रूप व अर्थ इतकाच कोशाचा अर्थ नाही. त्यात संज्ञेच्या सर्वांगीण स्पष्टीकरणासह सोबतीने येणा-या उपसंज्ञा, त्यांचे आकलन, व्यावहारिक उपयोजन, तुलना यांचाही समावेश करण्यात आला आहे. कोशाचे लेखन, संपादन, पडताळणी, पुनर्मूल्यांकन व संशोधनासाठी साडेतीन वर्षांहून अधिक काळ द्यावा लागला आहे. कोशातील ठळक विषयांबद्दल पाष्टे म्हणाले, अंकेषण (ऑडिटिंग),बँकिंग, लेखाकार्य व लेखाशास्त्र (बुक किपिंग अँड अकाउंटन्सी), अर्थसंकल्प, व्यवसाय नियंत्रण, वित्तीय बाजार, औद्योगिक अर्थशास्त्र, व्यावसायिक पर्यावरण, व्यवसाय संघटन, सार्वजनिक क्षेत्र, जनसंपर्क, कर, व्यापार, उत्पादन, नियोजन, बौद्धिक संपदा, विमा, विपणन कोशात समाविष्ट आहेत.

> परिशिष्टे आणि सूचीचा समावेश
> 34 प्रकरणांत विविध वाणिज्यविषयक संज्ञा, सिद्धांत, व्यावसायिक उपयोजन
> तीन वर्षांहून अधिक काळ संशोधन आणि संपादन
> संशोधक, अभ्यासक, जिज्ञासू आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त