आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Now Mocca On Retion Mafia, First Action Conducted In Nashik District

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेशन माफियांना माेक्का, राज्यातील पहिलीच कारवाई नाशिक जिल्ह्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेतील (रेशन) धान्याचा अपहार केल्याप्रकरणी राज्यात प्रथमच ‘माेक्का’ अंतर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९) कारवाई करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील पाच आरोपींविरोधात सोमवारी वाडीवरे (ता. इगतपुरी ) पोलिस ठाण्यात सोमवारी या कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात अाला. आतापर्यंत दहशतवादी, समाजविरोधी कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांविरोधातच ‘माेक्का’ लावण्यात येत होता.
संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, अरुण घोरपडे, मगन पवार आणि रमेश पाटणकर (रा. सर्व नाशिक) या पाच जणांची संघटित टोळी असून संपत हा त्यांचा म्होरक्या आहे. या टोळीविरोधात यापूर्वीही सहा गुन्हे दाखल असून चार गुन्ह्यांचा तपास सुरू आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

संपत घोरपडेच्या टोळीविरोधात लावलेल्या ‘माेक्का’अंतर्गत गुन्ह्याचा तपास जिल्हा उपअधिक्षक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. या तपासासाठी १८० दिवसांची मुदत देण्यात आली असून विशेष ‘माेक्का’ कोर्टापुढे या प्रकरणाची सुनावणी होईल. ‘रेशन धान्याचा प्रचंड प्रमाणात अपहार होत असल्याचे शासनाच्या लक्षात आले आहे. सर्वसामान्यांच्या हक्काच्या धान्याची अफरातफर करणाऱ्यांची अजिबात गैर केली जाणार नाही. या दृष्टीने रेशन धान्यावर नजर ठेवण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जाणार आहेत,’ असे बापट यांनी सांगितले.

नाशकातले रेशन माफिया
नाशिक जिल्ह्यातल्या रेशन माफियांच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीत समान धागा आढळून आला आहे. सरकारी अधिकारी, रेशन दुकानदार, वाहतूकदार, राइस मिल चालक यांनी संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून रेशन धान्याची चोरी केल्यानेच त्यांच्याविरोधात मोकाची कारवाई झाली आहे.

सुरगणा प्रकरण
१९ डिसेंबर २०१४ रोजी सुरगणा येथील धान्य गोदामाची तपासणी केल्यानंतर ३० हजार क्विंटल धान्याची अफरातफर उघडकीस आली. याप्रकरणी सात तहसीलदारांसह १६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात अाले.

सिन्नर प्रकरण
११ मार्च २०१५ रोजी १४० क्विंटल तांदळाचा अपहार उघडकीस आल्यानंतर पुरवठा निरीक्षक, रेशन दुकानदार, राइस मिल चालक आदींविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले.
राज्यात सव्वातीन हजार कोटींच्या धान्याची चोरी
सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेतल्या तब्बल सव्वातीन हजार कोटी रुपयांच्या अन्नधान्याची चोरी होत असल्याचा गौप्यस्फोट अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांनी सोमवारी केला. या रेशन माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी राज्य शासनाने कडक पावले उचलणार असल्याचे ते म्हणाले.

सध्या भारतीय दंडविधान किंवा अत्यावश्यक वस्तु कायद्याअंतर्गत रेशन माफियांवर कारवाई होते. मात्र अपुऱ्या तरतुदींमुळे हे आरोपी जामिनावर सुटतात. या पार्श्वभूमीवर प्रथमच ‘माेक्का’कारवाई करण्यात आली. मात्र याहीपुढे जाऊन दीर्घ तुरुंगवासाची तरतूद असणारा कायदा आणला जाणार आहे. या संदर्भात विधी सचिवांशी चर्चा झाली असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणून सामान्यांना पुरेसा धान्य पुरवठा होईल याची काळजी घेतली जाईल. या दृष्टीने धान्य व रॉकेलची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस बसवण्यात येतील. या वाहनांवर नजर ठेवण्याचे काम यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांकडूनच केले जायचे. आता मात्र ही जबाबदारी त्रयस्थ संस्थेकडे दिली जाईल. धान्य गोदामांत सीसीटीव्ही बसवण्यात येतील, असेही बापट यांनी जाहीर केले.