आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे विद्यापीठात आता ‘फॅशन डिझाइन’ची पदवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे विद्यापीठाने ‘फॅशन डिझाइन’ या विषयातील पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. पुण्याच्या ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’मध्ये (सॉफ्ट) यंदापासून हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाची पदवी शिक्षण देणारे पुणे विद्यापीठ राज्यातील तिसरेच विद्यापीठ आहे. यापूर्वी गोंडवाना व नागपूर विद्यापीठांत हा अभ्यासक्रम शिकवला जातो.

कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले की, पदवी अभ्यासक्रमाच्या शुल्कास अद्याप अंतिम मान्यता मिळालेली नाही. मात्र, या अभ्यासक्रमाचे अंदाजे शुल्क प्रतिवर्ष सुमारे 90 हजार रुपये असेल, असे डॉ. गाडे म्हणाले. विद्यापीठाच्या कला शाखेचे अधिष्ठाता डॉ. अशोक चासकर, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास देवल आदी या वेळी उपस्थित होते.


उज्ज्वल भविष्याची संधी
‘नोकरी आणि स्वयंरोजगार मिळवून देणारा अपारंपरिक पदवी अभ्यासक्रम म्हणून फॅशन डिझायनिंगकडे पाहावे लागेल. देशातल्या सर्वात मोठय़ा वस्त्रोद्योगाला कुशल मनुष्यबळाची नेहमीच कमतरता भासते. त्यामुळेच फॅशन डिझाइनची पदवी मिळवणार्‍या विद्यार्थिनींना चांगले भविष्य घडवण्याची संधी मिळेल.’ -डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, पुणे विद्यापीठ


टेक्स्टाइल पार्कमुळे फॅशन डिझाइनचे विस्तारते विश्व
‘कोल्हापूर, इस्लामपूर, बारामती, खेड, सोलापूर (प. महाराष्ट्र), बीड, लातूर, वसमत (मराठवाडा), धुळे (उत्तर महाराष्ट्र), अमरावती (विदर्भ) आणि भिवंडी (कोकण) या ठिकाणी टेक्स्टाइल पार्क उभारण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यातील सात टेक्स्टाइल पार्क सुरू झाले आहेत. प्रत्येक पार्कमध्ये 5 ते दहा हजार एवढय़ा संख्येने कुशल मनुष्यबळाची गरज असते. याशिवाय नाटक-चित्रपट-जाहिरात कला क्षेत्रांमधले कॉश्च्युम डिझायनिंग, फॅशन इंडस्ट्री आदींसाठी पर्सनल फॅशनिंग तज्ज्ञांना वाढती मागणी आहे.’ - सुरेश कराळे, सहयोगी प्राध्यापक, सॉफ्ट.


चार वर्षांचा अभ्यासक्रम
फॅशन डिझाइन पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा आहे. कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी प्रवेश घेऊ शकतात. या महिन्यापासून सुरू होणार्‍या अभ्यासक्रमात यंदा साठ विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाणार आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून तयार केलेल्या या अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वेशभूषाकारांचे मार्गदर्शन मिळणार असल्याचे देवल यांनी सांगितले.