आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदयात्रेमुळे ज्येष्ठांचे एकाकीपण ‘छूमंतर’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- संस्थेच्या सदस्यांचे सरासरी वय 62 वर्षे. सर्वच सदस्यांना जोडीदाराचा वियोग. दर रविवारी सगळे भेटतात. एकमेकांच्या सुखाने आनंदात, दु:खावर फुंकर घालतात. ही काही ज्येष्ठ नागरिक संघाची शाखा नाही, पुनर्विवाह मंडळ तर मुळीच नाही. पाच वर्षांपासून पुण्यात सक्रिय या संस्थेचे नाव आहे, आनंदयात्रा.

संस्थेच्या सर्वच सदस्यांची स्वत:ची एक कहाणी आहे. डॉ. हेमंत देवस्थळींचेच उदाहरण घेऊ. या समूहाचे सूत्रधार तेच आहेत. पुण्यात एका महाविद्यालयाचे प्राचार्य होते. पत्नी वृषालीही प्राध्यापक होत्या. सहा वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये जाणार्‍या वृषाली यांना ट्रकने उडवले. डॉ. देवस्थळींना धक्का बसला. 30 वर्षांचे सहजीवन क्षणात संपले. निवृत्तीनंतर पत्नीसोबत सहजीवनाची स्वप्ने रंगवणार्‍या देवस्थळींच्या नशिबी एकटेपण आले.
यातूनच जीवनाच्या या टप्प्यावर काही कारणाने एकट्या असलेल्या आपल्यासारख्या लोकांचा प्रश्न त्यांच्या लक्षात आला. नोकरीमुळे मुले बाहेरगावी असतात, वृद्ध आईवडिलांपैकी कोणी एखादा कायमचा निरोप घेतो. उतारवयात एकटेपणाचे दु:ख कोणी समजून घेऊ शकत नाही. याच विचारातून 2008 मध्ये ‘आनंदयात्रा’ स्थापन झाली. ही आनंदयात्रा या कहाणीच्या चांगल्या शेवटाचा प्रारंभ असल्याचे डॉ. देवस्थळी सांगतात.

आनंदयात्रेमुळे आशेचा अंकुर फुटल्याचे एक सदस्या म्हणतात. आम्ही एक स्वतंत्र जग तयार केले आहे. आता सर्वजण सणवार एकत्र साजरे करतो. वाढदिवस एखाद्याचा असतो, पण चंगळ सगळ्यांचीच. फेरफटका, थोड्या गप्पा, चित्रपटावर किंवा पुस्तकावर चर्चा आणि मुलांच्या येण्याची खबर किंवा फोनवरून मारलेल्या गप्पा. वेळ चुटकीसरशी निघून जातो, असे त्यांचे म्हणणे.

आनंदयात्रेच्या पाच शाखा
सध्या आनंदयात्रेचे 162 महिला-पुरुष सभासद आहेत. 2007 मध्ये डॉ. देवस्थळी यांनी वियोगाचे दु:ख भोगत असलेल्या लोकांनी एकत्र येण्यासाठी जाहिरात दिली तेव्हा फक्त 15 लोकांनी संपर्क साधला. तेव्हा शहराच्या विविध भागांत राहणार्‍या या नागरिकांच्या मनात आशेचा नवा अंकुर फुटला. आज पुण्यात आनंदयात्रीच्या विविध पाच शाखा कार्यरत आहेत.