पुणे- तोंडाला लावायच्या पावडरच्या डब्ब्यात 23 लाख रुपये किमतीचे अंदाजे 900 ग्रॅम सोने तस्करीच्या माध्यमातून दुबईहून पुण्याला आणणा-या एका व्यक्तीस सीमा शुल्क विभागाच्या अधिका-यांनी गजाआड केले आहे. दुबईहून पुण्यातील लोहगाव विमानतळावर उतरलेल्या स्पाईसजेटच्या विमानातून त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली.
इमामुद्दीन मोतीमियॉ कादरी असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे. कादरी हा बुधवारी स्पाईस जेटच्या दुबई ते पुणे विमानातून प्रवास करीत होता. तो पुणे विमानतळावर आल्यानंतर सुरक्षितरित्या बाहेर पडण्यासाठी तो अंदाज घेत होता. मात्र, त्याच्या हालचाली सीमा शुल्क विभागाच्या अधिका-यांना संशयास्पद वाटल्या. त्यावेळी त्याच्याकडील सामानाची कसून तपासणी केली असता त्याच्याजवळ असलेल्या पावडरच्या डब्ब्याचे वजन छापील वजनापेक्षा जास्त असल्याचे आढळले. तसेच अधिका-यांनी डब्ब्याचे तोंड फोडले असता त्यातून पावडर पडत नसल्याचे लक्षात आले.
सीमा शुल्क विभागाच्या अधिका-यांनी त्यानंतर तो डब्बा फोडण्याचा निर्णय घेतला. एका कटरच्या सहाय्याने पावडरचा डबा कापला असता त्यात वितळलेले सोने आढळून आले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करून कादरीला अटक केली तसेच त्याच्याकडील सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या अधिका-यांनी या सोन्याचे वजन केले असता ते 882 ग्रॅम इतके भरले. या सोन्याची भारतीय बाजारपेठेत सुमारे 24 लाख रूपये किंमत असल्याचे सीमा शुल्कच्या अधिका-यांनी सांगितले.