आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Year Without Balasaheb : Raj Uddhav Quarrel Still Run

एक वर्ष बाळासाहेबांनंतरचे;राज-उद्धव दुरावा कायमच, जाणवतो मात्र कमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/मुंबई - बाळासाहेबांनंतर शिवसेनेबाबत वर्षभरापूर्वी अनेक अंदाज बांधले जात होते. उद्धव ठाकरे पक्षाची धुरा पेलू शकतील काय? बहुतांश शिवसैनिक राज ठाकरे यांच्या महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेत जातील, आदी आदी... मात्र, हे फक्त अंदाजच ठरले.
गेल्या वर्षभरात मनसेने कोणतेही मोठे आंदोलन केले नाही, ना मोठा राजकीय कार्यक्रम. मात्र, रतन टाटांपासून अदनान सामी व शिल्पा शेट्टीपर्यंत अनेक दिग्गज त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी येऊन गेले. बॉलीवूड आणि उद्योग जगतात ज्याला कुणाला राजकीय मदतीची गरज असते, तो आजकाल राज ठाकरेंकडे धाव घेतो.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या खात्यावर मात्र या कालावधीत विशेष यश दिसले नाही. उलट, माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे बंड व बाळासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दा हाताळताना त्यांचा गोंधळ उडाल्याचे दिसले. नीता अंबानी यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीतील उपस्थिती व ठाणे महानगरपालिकेत जुळवाजुळव करून बहुमत मिळवल्याने ते थोडेफार चर्चेत राहिले.
बाळासाहेब आपल्या तिखट आणि जहाल भाषणांसाठी ओळखले जात असत. उद्धव यांच्या बोलण्यात सहजता आहे. वडील बेधडक आणि ताबडतोब निर्णय घेत असत. घेतलेल्या निर्णयावर माघार नसे. उद्धव सहका-यांशी चर्चा करून निर्णय घेतात. गरज भासल्यास तो बदलतातही. अंधश्रद्धाविरोधी कायद्याच्या मुद्यावर हेच दिसले. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येनंतर त्यांच्या सहका-यांनी उद्धव यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी या कायद्याला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. परंतु धार्मिक नेते व तीव्र विरोधानंतर पुन्हा भूमिका बदलली.
मवाळ प्रतिमा असलेले उद्धव राजकीय खेळी आणि प्रभाव यात राजच्या तुलनेत कुठेही मागे नाहीत. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला बहुमत नव्हते. आधी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकास राजीनामा द्यायला लावला व पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार बिनविरोध निवडून आणला. त्यामुळे मुंबईनंतर सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ठाणे महापालिकेते शिवसेनेला बहुमत मिळाले.
बाळासाहेब ठाकरे दर आठवड्याला ‘सामना’ मुखपत्रात संपादकीय लिहून राष्‍ट्रीय, आंतरराष्‍ट्रीय मुद्यांवर भाष्य करत असत. तसेच ठराविक अंतराने त्यांच्या मॅरेथॉन मुलाखती प्रसिद्ध होत असत. परंतु उद्धव यांच्यात तसे अष्टपैलुत्व दिसत नाही. ते बहुभाषिक मुंबई व राजकीय समन्वयवादाची वकिली करताना दिसतात. परंतु त्यांची आक्रमक भाषणेदेखील माध्यमांची मुख्य बातमी ठरतात. बाळासाहेबांनंतर मराठी माणूस व मराठी अस्मितेचे मुद्दे आता राज ठाकरेच आक्रमकपणे मांडताना दिसतात. भाषणात एखादा मुद्दा घेतला तर त्याचे पूर्ण विश्लेषण केल्यानंतरच पुढच्या मुद्याकडे वळतात.
एकाच मुशीतील दोन वेगळी व्यक्तिमत्त्वे
उद्धव ठाकरे
०शांत, संयमी. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी आक्रमकता त्यांच्यात नाही.
०सेनेच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतरच पावले उचलतात; पण आवश्यकता भासल्यास ठोस आणि कूटनीतिपूर्ण निर्णय घेण्यात मागे नाहीत.
०साधे जेवण आणि साधे कपडेच आवडतात. अवडंबर आणि झगमगाटापासून अलिप्त.
०आक्रमक व प्रभावशाली भाषण करू शकत नाहीत. श्रोत्यांशी थेट संवाद साधण्याची वडिलांसारखी कला त्यांच्यात नाही. वडिलांसारखे वक्ते नाहीत.
राज ठाकरे
०आक्रमक नेते. बोलणे, चालणे, भाषणात बाळासाहेबांसारखेच. युवकांचे आवडते.
०राज ठाकरे यांनी पक्षात स्वत:पेक्षा कोणालाही मोठे होऊ दिले नाही. यामुळे पक्ष अपेक्षेनुरूप पुढे जाऊ शकला नाही. कोणाचाही सल्ला न घेता निर्णय घेण्याची वृत्ती बाधक आहे.
०राज फॅशनेबल आहेत. प्रसंगानुरूप कपडे घालतात. सभेत कुर्ता, पायजमा, जॅकेट, तर अन्य ठिकाणी सुटाबुटात जातात. स्वत: गाडी चालवतात.
०खाण्याचे शौकीन. लज्जतदार विदेशी आणि भारतीय पदार्थांचे शौकीन.