आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देश कधीच सहिष्णू नव्हता, राजन खान यांच्या वक्तव्याने ‘पुरोगाम्यांची’ भंबेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘भाजप सत्तेत आला म्हणून देशातले वातावरण वगैरे बिघडलेले नाही. हा देश कधीच सहिष्णू नव्हता. गौतम बुद्धांपासूनच असहिष्णुतेची परंपरा आहे. मग गेल्या साठ वर्षांत काँग्रेस, समाजवादी आणि डाव्यांनी काय केले, हा खरा प्रश्न आहे,’ असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातली असहिष्णुता वाढल्याच्या आरोपावरून ‘पुरस्कार वापसी’ केलेल्या प्रा. गणेश देवी, अनिल जोशी, प्रज्ञा पवार, संभाजी भगत, गणेश विसपुते यांच्यासह अनेक पुरोगामी कार्यकर्त्यांसमोर राजन खान यांनी आक्रमक मांडणी केली.

निमित्त होते ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गणेश देवी यांच्या ‘दक्षिणायन’ मोहिमेच्या प्रारंभाचे. देशातल्या असहिष्णुतेच्या मुळाशी जाती वर्चस्वाचा खेळ असल्याचे सांगून ‘समाजवादी आणि डाव्यांमधली तरी जात गेली का,’ असा प्रश्न खान यांनी उपस्थित केला. ‘माझे बालपण सेवा दलात गेले. तिथे माझ्या जातीबद्दलचीच उत्सुकता असायची. खान असूनही मी मराठी चांगला कसा बोलतो, असले मला ऐकावे लागले. ‘राजन’ म्हणजे हिंदू की ‘खान’ म्हणजे मुसलमान याकडे लोकांचे अधिक लक्ष असायचे,’ हे नमूद करताना चळवळीतल्या लोकांना आधी स्वतःची जात सोडावी लागेल, असे खान म्हणाले.

यानंतर प्रा. देवी यांनी ‘दक्षिणायन’ची भूमिका स्पष्ट केली. ‘ही मोहीम कोणाच्या विरोधात किंवा बाजूने नाही. सध्या असहिष्णुतेचे वातावरण आहे आणि दीड वर्षापूर्वी देश पूर्ण सहिष्णु होता, असेही माझे मत नाही. लोकांशी संवाद साधत परिस्थितीचे आकलन करण्यासाठीच ही पक्षविरहित मोहीम आहे. आपले स्वातंत्र्य आपण जपूयात, या गांधी तत्त्वाच्या प्रसाराचा विधायक प्रयत्न आहे,’ असे ते म्हणाले.
असहिष्णुता आणि जात
‘ संघाचा बागुलबुवा उभा करत काँग्रेसने दलित-मुस्लिमांना घाबरवले. समाजवादी, डाव्यांनी हेच केले.यासाठी नुसत्या ब्राह्मणांना दोष देऊन चालणार नाही. इतर साडेआठ हजार जातीसुद्धा तितक्याच दोषी आहेत. ‘ब्राह्मणांना जवळ घेऊ,’ असे विद्रोही साहित्य संमेलनात मी म्हणालो, तर विद्रोह्यांनी माझ्यावर बहिष्कार टाकला.’
राजन खान, प्रसिद्ध लेखक
शाळांमधून होतेय विद्वेषाची पेरणी
शाळांमधले देव पहिल्यांदा उठवायला हवेत. शाळांमधूनच धार्मिकता आणि विद्वेषाची पेरणी होते. याकडे कोणाचे लक्ष नाही. मुलांवर संस्कार करणारी संस्था शिल्लक नाही. समाजवादी धर्मनिरपेक्षता हे राज्यघटनेचे मूल्य शिकवणारी व्यवस्था देशात हवी, असे मत खान यांनी व्यक्त केले.
दक्षिणायन मोहीम
आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ प्रा. गणेश देवी यांनी बुधवारी पुण्यातून ‘दक्षिणायन’ मोहीम सुरू केली. साहित्य अकादमी पुरस्कार परत केलेले कवी अनिल जोशी यांच्यासह आठ गुजराती साहित्यिक, कलावंत यात आहेत. ही मंडळी गुरुवारी कोल्हापूर आणि शुक्रवारी धारवाडला पोहोचणार आहे. ३० जानेवारीला गुजरातेतील दांडी येथे ‘दक्षिणायन’चा समारोप होईल.