आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसंगत रक्तगटाच्या आजीची किडनी नऊ वर्षांच्या नातवाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - रक्तगट न जुळणाऱ्या मुत्रपिंडाचे यशस्वी रोपण करून नऊ वर्षांच्या मुलाचे प्राण वाचवण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश आले. आदित्य बिर्ला स्मृती रुग्णालयात विसंगत रक्तगटाच्या (एबीओ न जुळणारी) मुत्रपिंडाचे रोपण करण्यात आले. मुत्रपिंडरोग तज्ज्ञ डॉ. तरुण जेलोका यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शस्त्रक्रिया झालेला मुलगा गिरीश आणि त्याचे वडील जयवंत थोरात, मुत्रसंस्था तज्ज्ञ डॉ. अमोल पाटील, आनंद धाराशंकर आदी या वेळी उपस्थित होते.

यापूर्वी वीस प्रौढांमध्ये विसंगत रक्तगटाच्या मुत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. नऊ वर्षांच्या मुलावर पहिल्यांदाच ही शस्त्रक्रिया झाल्याचे डॉ. जेलोका यांनी सांगितले. ‘गिरीशची प्रकृती बिघडल्याने जानेवारी महिन्यात वडिलांनी त्याला रुग्णालयात आणले. तो तीन वर्षांचा असताना नेफ्रोटिक सिंड्रोमचे निदान झाले होते. या विकारात मुत्रपिंडाच्या चाळण्यांमधून गळती सुरू होते. रक्तातील प्रथिने मोठ्या प्रमाणात लघवीत येऊ लागल्याने मुत्रपिंड खराब होत जाते. गिरीशवर औषधोपचार सुरू होते. दोनदा बायोप्सी होऊनसुद्धा गुण आला नाही. त्यामुळे स्थिती बिघडत जाऊन मुत्रपिंड खराब होण्याच्या अंतिम टप्प्याची स्थिती आली. तीन वर्षांपूर्वीपासून गंभीर स्वरुपाच्या मुत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांवर केला जाणारा उपचार म्हणजे पेरिटोनिअल डायलिसिसवर त्याला ठेवावे लागले होते’, असे डॉ. जेलोको यांनी सांगितले.

मुत्रपिंड निकामी झाल्यानंतर दर महिन्याला, दर आठवड्याला डायलिसिस करावे लागते. हा प्रकार वेदनादायी असतो. शिवाय अडचणीही येतात. प्रत्यारोपणामुळे रुग्णाचे आयुष्य वाढते. डायलिसिसपेक्षा प्रत्यारोपणाचा खर्चही कमी असतो, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
आयुष्यभर औषधांवर : विसंगत रक्तगटाच्या मुत्रपिंडाचे रोपण करण्यासाठी अनावश्यक अँटीबॉडीज काढून टाकाव्या लागतात. त्यासाठी प्लाझमा बदलावा लागतो. पण या शस्त्रक्रियेत अँटीबॉडीज खूप कमी असल्याने एबीओ-विसंगत रोपणाचा निर्णय घेतला गेला. या अवयव रोपणात एबीओ रक्तगट असला तरी उपलब्ध अवयवाचा कार्यक्षम उपयोग केला जाऊ शकतो. हे रोपण यशस्वी ठरले. गिरीश आता ठणठणीत असून त्याला आता कधीच डायलिसिस करावे लागणार नाही. औषधे मात्र आयुष्यभर घ्यावी लागतील.

आजीची किडनी नातवाला
गिरीश फक्त नऊ वर्षांचा असल्याने मुत्रपिंड रोपणात गुंतागुंत होती. योग्य रक्तगटाचा दाता मिळत नव्हता. गिरीशची आजी मुत्रपिंड दान करण्यास तयार झाली. पण आजीचा रक्तगट ‘एबी' आणि गिरीशचा रक्तगट ‘ए' होता. त्यामुळे डॉक्टरांनी संभाव्य धोक्याची कल्पना देऊन शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
पुढे वाचा... चार महिन्यांच्या मुलीवर हृदयशस्त्रक्रिया
बातम्या आणखी आहेत...