आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEWS @ MH: माजी खासदार खतगावकर भाजपात?, मेहुणे अशोक चव्हाणांचीच \'खेळी\'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- काँग्रेस संस्कृती व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अखेर नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत आपले तिकीट कापून अशोक चव्हाणांनी दबावाचे राजकारण केल्याची खंत खतगावकर यांच्या मनात होती. त्यामुळे पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. दरम्यान, खतगावकर गडकरींच्या संपर्कात असून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच या घटनेमागे स्वत: अशोक चव्हाण असल्याची माहिती मिळत आहे. अद्याप आपण असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे खतगावकर यांनी म्हटले आहे.
खतगावकर हे अशोक चव्हाणांचे मेहुणे आहेत. चव्हाण यांच्या बहिणीचे भास्करराव पाटील-खतगावकर यांच्याशी झालेले आहे. 2009 ते 2014 या काळात ते नांदेडचे खासदार होते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अशोक चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांची उमेदवारी कापण्यात आली. त्यामुळे ते काहीसे दुखावले होते. नांदेडमध्ये नरेंद्र मोदींची सभा झाली होती. त्यावेळी आपल्या बहिणीच्या घरातील कोणी हिसकावून घेत नाही ते आपण देतो असे सांगत अशोक चव्हाणांवर तोफ डागली होती. या एका वाक्यामुळे खतगावकरांचा स्वाभिमान जागा झाला. त्यानंतर ते अशोक चव्हाण यांच्यापासून फटकून वागत होते. अखेर खतगावकरांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
खतगावकरांनी याबाबत बोलताना सांगितले की, अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीला कंटाळलो होतो. काँग्रेसनेही आपल्यावर अन्याय केला त्यामुळे अखेर मी पक्षातून बाहेर पडत आहे. आपल्याला अनेक पक्षांकडून ऑफर आहेत. मात्र, मी अद्याप कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. तसेच आपण आगामी विधानसभा निवडणूकही लढविणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पदाच्या लालसेने मी काँग्रेस सोडत नाही व इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. अशोक चव्हाण यांच्या मनमानी कारभाराला आपण कंटाळलो आहोत. त्यांना कार्यकर्त्यांचा मान-सन्मान करता येत नाही. त्यांच्यासाठी आपण लोकसभेला मागे फिरलो पण त्याची त्यांना किंमत नाही. त्यामुळे मी निराश झालो व त्यामुळेच काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे खतगावकर यांनी स्पष्ट केले.
...ही तर अशोक चव्हाणांचीच खेळी?- दरम्यान, खतगावकर हे भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे. खतगावकर गडकरींच्या संपर्कात असल्याचे कळते. पेड न्यूज प्रकरणी अशोक चव्हाणांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच चव्हाण यांच्यावर पुढील सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातली जाऊ शकते. अशा स्थितीत नांदेडची खासदारकी आपल्याच घरात किंवा नातेवाईकांत रहावी यासाठी चव्हाण-खतगावकर या दोन मेहुण्यांनीच ही खेळी असल्याचे बोलले जात आहे.
अशोक चव्हाण सध्या अडचणीत आहेत. तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अशोक चव्हाणांना कोणत्याही स्थितीत सहजासहजी पुढे येऊ देत नाहीत हे लक्षात येताच मेहुणे खतगावकर यांना गडकरींच्या माध्यमातून भाजपात पाठविले जात आहे. खतगावकर भाजपमध्ये गेल्यास त्यांना उमेदवारी मिळू शकते व त्यांना अशोक चव्हाण सहज निवडून आणू शकतात अशी चर्चा आहे. पुढील महिन्याभरात अशोक चव्हाणांच्या पेड न्यूज प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच चव्हाण हे राजकीय सोय करून ठेवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.