सांगली- तुरुंगात असताना झालेल्या आंदोलनप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाला. इथे तर मंत्री पतंगराव कदम यांच्यासमोर आमच्या कार्यकर्त्यावर खुनी हल्ला झाला, त्यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी दिली तरीही त्यांच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही? असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. तसेच कदम यांच्यासह त्यांच्या बगलबच्च्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
पलूस (जि. सांगली) येथील आमसभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यासपीठावरच मारहाण झाली होती. याबाबत शेट्टी म्हणाले की, राजोबा यांनी सात वर्षांपूर्वी झालेल्या सभेत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली का? असा सवाल उपस्थित केला होता. यावर पतंगराव यांच्यासमोरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजोबा यांना मारहाण केली. गेल्या वर्षी मी कारागृहात असताना कोल्हापुरात कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्याचा गुन्हा तक्रारीशिवाय दाखल झाला. इथे पतंगरावांसमोरच मारहाण झाली. पण पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. राज्य सरकार मला एक न्याय आणि राज्यातील मंत्र्यांना एक न्याय देत असेल तर व्यवस्थेवरील विश्वास उडेल. पोलिसांनी पतंगराव कदम यांच्यावरही खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा शेट्टी यांनी दिला.
पुढे वाचा, गृहमंत्री आबांचा पोलिसांवर वचक नाही, दलवाईंची टीका...