आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Owaisi For Muslim Quotas In Maharashtra, Speedy Trial In Cases

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गरिबी, अज्ञानाविरुद्ध ‘जिहाद’ पुकारा, खासदार असदुद्दीन ओवेसींचे आवाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - इसिससारख्या दहशतवादी संघटनांचा इस्लामशी काडीचाही संबंध नाही. खुनी, बलात्कारी इस्लाम असू शकत नाही. मुस्लिम तरुणांनी अशा संघटनांपासून चार हात दूर राहावे. त्यांनी गरिबी आणि अज्ञानाविरुद्ध जिहाद पुकारावा, असे आवाहन ‘मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन’चे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून केले. दहशतवादी संघटनांकडे मुस्लिम तरुण आकर्षित होणार नाहीत याची जबाबदारी मुस्लिम बुद्धिवंत आणि समाजावर असल्याचेही ते म्हणाले.

मुस्लिम आरक्षण परिषदेसाठी पुण्यात आलेल्या आेवेसींनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना- भाजपसह काँग्रेस- राष्ट्रवादीवरही टीका केली. "बकरी ईदला डोक्यावर टोपी चढवून शिरखुर्मा खा, इफ्तारच्या दावती दे, दर्ग्यावर चादर चढव असल्या प्रतीकात्मक कृतींशिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीने मुस्लिमांसाठी आजवर काही केले नाही. त्यामुळेच राज्यातल्या आगामी निवडणुकीत भाजप- शिवसेनेबरोबरच काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्षही आमचे मुख्य विरोधक असतील. राज्यात मुस्लिमांना आरक्षण द्यायचेच असते तर काँग्रेस- राष्ट्रवादीला थेट कायदा करता आला असता. त्यासाठी आवश्यक संख्याबळ आणि वेळ त्यांच्याकडे होता; पण निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिमांची फसवणूक करायची असल्याने त्यांनी आरक्षणाची फक्त अधिसूचना काढली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या बौद्धिक खोटारडेपणामुळे (इंटेलेक्चुअल डिसऑनेस्ट) मुस्लिम समाजाचे आतापर्यंत नुकसानच झाले’, असा आरोपही खासदार ओवेसी यांनी केला.

मुस्लिम समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे अनेक आयोगांच्या अहवालातून सिद्ध झाले आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. न्यायालयानेही मुस्लिमांचे मागासलेपण मान्य केले आहे. राज्य सरकारने याची दखल घेऊन मुस्लिमांसह इतर मागास समाजांना त्वरित आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी आेवेसी यांनी केली.

अमित शहांवर मर्जी का?
"सीबीआयने दररोज सुनावणी घेऊन अमित शहांची केस सात महिन्यांत निकाली काढली. दुसरीकडे गरीब मुस्लिम तरुण आठ- आठ वर्षे तुरुंगात सडत आहेत. या तरुणांच्या केससुद्धा जलद चालवून निकाली काढल्या पाहिजेत. जे दोषी असतील त्यांना शिक्षा द्या; पण निरपराध मुस्लिम तरुणांची आयुष्ये वाया का घालवता? जो न्याय शहांना तोच निरपराध मुस्लिमांनाही मिळाला पाहिजे,’ असे ओवेसी म्हणाले.

३ हजार कोटींची मागणी
"महाराष्ट्रात ११ टक्के मुस्लिम असताना त्यांच्यासाठी फक्त २२० कोटींची तरतूद काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने केली होती. महाराष्ट्राच्या यंदाच्या अर्थसंकल्पात अल्पसंख्याक मुस्लिमांसाठी ३ हजार कोटींची तरतूद करावी,’ अशी मागणी ओवेसी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मोदी आणि संघ
प्रत्येक हिंदूने दहा अपत्यांना जन्म द्यावा, असे आवाहन संघ परिवारातील नेते करीत आहेत. या मुद्द्यावर बोलताना "असे बोलणार्‍यांनी आधी स्वतः दहा मुले जन्माला घालावीत मग इतरांना सल्ले द्यावेत," अशी टिप्पणी ओवेसी यांनी केली. ‘‘सबका साथ सबका विकास'' अशी घोषणा देत नरेंद्र मोदींनी सत्ता मिळवली. पण ते खोटे ठरत आहेत. त्यांचे खरे रूप उघड होऊ लागले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.