आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्र्यांच्या आत्मचरित्राचा खंड ऑगस्टमध्ये; मुलीची भावना, 'निरोपाच्या खंडाने अखेरची समिधा'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘माझ्या आत्मचरित्राच्या निमित्ताने मी महाराष्ट्राचा इतिहास सांगतोय,’ असे सार्थ अभिमानाने गर्जणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या आत्मचरित्राचा अखेरचा खंड प्रकाशनाच्या मार्गावर आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये अत्रे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून हा खंड वाचकांच्या भेटीस येईल आणि एकूण आठ खंडांचा हा बृहत्प्रकल्प पूर्णत्वास जाईल.

संपादक, पत्रकार, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक, राजकीय नेते, अाध्यापक, साहित्यिक अशा बहुविध पैलूंनी युक्त असणारे आचार्य अत्रे यांचे व्यक्तिमत्व नेमके कसे घडले, त्यांनी पाहिलेला अखंड महाराष्ट्र कसा होता, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या झंझावातावर अत्रे कसे स्वार झाले होते, विधानसभा त्यांनी कशी गाजवली, असा उत्कंठावर्धक कालखंड ‘कऱ्हेचे पाणी’च्या आठव्या खंडात वाचकांसमोर येईल, अशी माहिती अत्रे यांच्या कन्या आणि खंडाच्या लेखिका मीना देशपांडे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

‘कऱ्हेचे पाणी’ हे आचार्य अत्रे यांचे आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्राचे पाच खंड स्वत: अत्रे यांनी लिहिले आहेत. ते वाचकांमध्ये अतिशय लोकप्रियही आहेत. मात्र, ‘कऱ्हेचे पाणी’च्या निरोपाच्या खंडात पत्रकार, अग्रलेखकार व संपादक अत्रे वाचकांना भेटणार आहेत. विशेषत: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्रे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या पत्रकारितेचे विविध पैलू या खंडात एकत्रित स्वरूपात आहेत.
असा समारोप खंड
पत्रकार, संपादक म्हणून अत्रे यांचे कार्य
समाजातील अनिष्ट प्रवृत्तींवरील घणाघाती लेखन
पाणीप्रश्नावरील अत्रे यांचे अभ्यासपूर्ण लेख
विधानसभेतील गाजलेली त्यांची भाषणे
अत्रे यांच्या जीवनातील १९६६ ते ६९ हा कालखंड
एकूण आठ खंडांचा आत्मचरित्रपर लेखनप्रकल्प
निरोपाच्या खंडाने अखेरची समिधा
पप्पा (अत्रे) १३ जून १९६९ ला गेले. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या जीवनातले अखेरचे पर्व आठव्या खंडात संग्रहित केले आहे. पप्पा गेल्यावर खूप उशिराने म्हणजे १९९४ मध्ये मी सहाव्या खंडाच्या लेखनाला सुरुवात केली. हा एक यज्ञच होता. आता निरोपाच्या खंडाने त्यात अखेरची समिधा अर्पण केली आहे. कार्यपूर्तीचे समाधान आहे.
मीना देशपांडे, अत्रे यांच्या कन्या आणि खंडाच्या लेखिका