आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनी पुण्यात एकपात्री दिनाचा उपक्रम प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- रंगभूमी दिनाचे औचित्य साधून दरवर्षी ठिकठिकाणी विविध नाट्यविषयक उपक्रम साजरे होतात. मात्र, यावर्षीचा रंगभूमी दिन स्पेशल ठरणार आहे. रंगभूमी दिनाच्या मुहूर्तावर राज्यभरातील एकपात्री कलाकार एकत्र आले असून यंदापासून प्रतिवर्षी आठ नोव्हेंबरला एकपात्री दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकपात्री प्रयोगांच्या माध्यमातून समस्त मराठी मनांना खळखळून हसवणार्‍या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनी, आठ नोव्हेंबरला या नव्या उपक्रमाचा श्रीगणेशा होणार आहे.

एकपात्री सादरीकरण हा रंगभूमीवरील वैशिष्ट्यपूर्ण कलाप्रकार आहे. विशेषत: पु. ल. देशपांडे यांनी बटाट्याची चाळ, असा मी असा मी, हसवण्याचा माझा धंदा अशा अनेक सादरीकरणांतून हा प्रकार लोकप्रिय केला. एकपात्री सादरीकरणातील त्यांचे हे अपूर्व योगदान लक्षात घेऊनच एकपात्री परिषदेने पुलंच्या जन्मदिनी आठ नोव्हेंबरला एकपात्री दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे, एकपात्री कलाकार व निवेदक सुधीर गाडगीळ, मसापच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांच्या उपस्थितीत बंडा जोशी, वंदन नगरकर, उज्ज्वला कुलकर्णी, संतोष चोरडिया, अभय देवरे आदी कलाकार सादरीकरण करतील.

जागरूकतेचा प्रयत्न
या नव्या संकल्पेतून राज्यातील कलाकारांना एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकपात्री कलाविष्काराविषयी युवा मनात जागरूकता निर्माण करणे, प्रेक्षक घडवणे याकडेही लक्ष देणार आहोत. सुमारे दीड तास एकट्याने कलाविष्कार सादर करू शकणारा कोणताही कलाकार सहभागी होऊ शकेल. त्यांनी 9822519134 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘आम्ही एकपात्री संस्थ’चे अध्यक्ष संतोष चोरडिया यांनी केले.

40 कलाकार सहभागी
एकपात्री कलाकारांच्या राज्यस्तरीय संस्थेने एकपात्री दिनानिमित्त एकपात्री कलाप्रकाराविषयी जागरूकता, परिसंवाद, चर्चा, प्रशिक्षण शिबिरे, पुरस्कार, स्पर्धात्मक कार्यक्रम आदी उपक्रमांविषयी विचार सुरू केला आहे. सध्या राज्यभरातून सुमारे चाळीस एकपात्री कलाकार या उपक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामध्ये पुण्यासह मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सातारा, मिरज, सांगली, सोलापूर येथील कलाकारांचा समावेश आहे.