आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Paddy Producers Give Honour To State To Get Krishi Karman Award

धान उत्पादकांनी राज्याला मिळून दिला 'कृषी कर्मण पुरस्कार'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - धान (तांदूळ) उत्पादकांच्या कष्टामुळे राज्याच्या कृषिमंत्र्यांना केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे देण्यात येणारा ‘कृषी कर्मण पुरस्कार’ स्वीकारण्याचा मान मिळणार आहे. 2012-13 मध्ये तांदूळ उत्पादनात आघाडीसाठी 25 लाख रुपयांचा हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते 10 फेब्रुवारीला दिल्लीत वितरित केला जाणार आहे.
2012-13 च्या खरिपात राज्यात 30 लाख टन भाताचे उत्पादन झाले. गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या तांदूळ उत्पादनात 2.15 लाख टनांची वाढ झाली. कोकण आणि विदर्भातील प्रमुख खरीप पीक असलेला तांदूळ पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि अल्प प्रमाणात लातूर विभागातही पिकवला जातो. अन्नधान्यांच्या उत्पादनात देश स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने 2011 पासून उत्पादकता पुरस्कार देण्याची सुरुवात केली आहे. तांदूळ, गहू, तेलबिया आदींच्या उत्पादनासाठी पुरस्कार राज्यांना दिले जातात.
यंदा कोकण, विदर्भात चांगला पाऊस झाल्याने राज्यातील खरीप तांदूळ पिकाखालचे क्षेत्र 15.28 लाख हेक्टर इतके होते. तांदूळ उत्पादनात विदर्भाने राज्यात बाजी मारली. विदर्भाने सर्वाधिक म्हणजे 12.75 लाख टनांचे उत्पादन घेतले. पाठोपाठ कोकणातील चार जिल्ह्यांनी 11 लाख टन उत्पादन काढले. पश्चिम घाटाचा भाग असणा-या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरातही तांदूळ पिकतो. नाशिक विभागाने 1.17 टन तर कोकणाला लागून असलेल्या कोल्हापूर विभागाने 3.86 टनांचे उत्पादन घेतले. नांदेड परिसरातील तांदूळ उत्पादनामुळे लातूर विभागानेही राज्याच्या उत्पादनात 0.10 टनांची भर टाकली.
उत्पादकतेत प्रगतीची गरज
गेल्यावर्षी तांदळाची राज्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी 18.36 क्विंटल होती. 2012-13 च्या हंगामात यात थोडी वाढ होऊन 19.02 क्विंटल प्रती हेक्टरवर पोहोचली. राष्ट्रीय उत्पादकता 23.12 क्विंटल प्रती हेक्टर आहे. तांदूळ उत्पादनात चीन जगात पहिल्या तर भारत दुस-या क्रमांकावर येतो. हेक्टरी 172 क्विंटल विक्रमी उत्पादन घेणा-या चीनची उत्पादकता भारतापेक्षा खूप अधिक आहे. तांदळाची राष्ट्रीय उत्पादकता आणि जागतिक विक्रम या तुलनेत महाराष्ट्राची हेक्टरी उत्पादकता कमी आहे.