आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्माताईच्या जन्मशताब्दीचा विसर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- स्त्रीचे भावविश्व आपल्या कवितेच्या केंद्रस्थानी ठेवून काव्यसृष्टीची उपासना करणाºया ज्येष्ठ कवयित्री पद्मा गोळे यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होत आहे. मात्र आज महाराष्ट्रातील साहित्यविश्वाला त्यांचा, त्यांच्या कवितेने दिलेल्या योगदानाचा विसर पडला आहे. साहित्यविश्वातील आद्य संस्थेचे बिरूद मिरवणाºया साहित्य महामंडळाच्या घटक संस्थेला आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही पद्मातार्इंच्या जन्मशताब्दी वर्षाची आठवण नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
सरदार घराण्याची खानदानी पार्श्वभूमी लाभलेल्या मूळच्या पटवर्धन पद्मातार्इंचे जन्मशताब्दी वर्ष 10 जुलै पासून सुरू होत आहे. संपन्न घराण्याचा वारसा मिळालेल्या पद्मातार्इंनी स्वातंत्र्यपूर्व काळात पदव्युत्तर पदवी मिळवून काव्यलेखनाला सुरुवात केली होती. 1947 मध्ये त्यांचा ‘प्रीतिपथावर’ हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि पदार्पणातच त्यांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. अन्य कवींप्रमाणेच पद्मातार्इंच्या काव्यविश्वावरही सुरुवातीला गोविंदाग्रज, भा. रा. तांबे तसेच रवींद्रनाथांच्या लेखनाचा प्रभाव होता. प्रीतिभावनेइतकेच स्वातंत्र्य, समतेच्या मूल्यांचे आकर्षण त्यांच्या काव्यात दिसते. पद्मातार्इंच्या पुढच्या ‘निहार’ (1954) या कवितासंग्रहातील कविता मात्र अन्य लेखकांच्या प्रभावापासून मुक्त वाटतात. त्यांना त्यांची वाट, त्यांचा सूर सापडल्याची खूण त्यातून दिसते. स्वप्नजा (1962), आकाशवेडी (1968) आणि श्रावणमेघ (1988) या नंतरच्या कवितासंग्रहांतून त्यांचे स्वत:चे सूर आळवताना दिसतात. स्त्रीचे भावविश्व हा त्यांच्या कवितेचा केंद्रविषय असला तरी निसर्गसौंदर्य, बदलत्या वातावरणात स्त्रीमनाची होणारी घुसमट, ताणतणाव, तगमग त्या समर्थपणे व्यक्त करतात. माझ्या पाठच्या बहिणी, आईपणाची भीती, चाफ्याच्या झाडा, मी माणूस, लक्ष्मणरेषा अशा अनेक कविता हे अधोरेखित करतात. जन्मशताब्दीच्या प्रारंभाचा विसर पडला तरी निदान येत्या वर्षभरात त्यांचे स्मरण साहित्यसंस्था करतील, अशी आशा आहे.
चुकीची जन्मतारीख- मराठी साहित्यविश्वात महत्त्वाचे योगदान देणाºया लेखिकांच्या तसबिरी साहित्यप्रेमी भगिनी मंडळाकडून महाराष्ट्र साहित्य परिषदेला देण्यात आल्या आहेत. परिषदेच्या कार्यालयात त्या लावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पद्मा गोळे यांचीही तसबीर आहे. मात्र त्यावर पद्मातार्इंच्या जन्मतारखेचा उल्लेख 10 जून असा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात ती तारीख 10 जुलै अशी आहे.
कवितेचा आरंभबिंदू : डॉ. अरुणा ढेरे- पद्मातार्इंविषयी प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, रविकिरण मंडळानंतरच्या स्थित्यंतराच्या काळात पद्माताई, इंदिरा संत आणि संजीवनी मराठे यांनाच आधुनिक कवितेचा आरंभबिंदू मानावे लागेल. प्रेम, वात्सल्याचे अनेक सूक्ष्म पदर त्यांच्या कवितेतून उलगडताना दिसतात. मराठी काव्यप्रांतात त्यांच्या कवितेने ठसठशीत ओळख निर्माण केली आहे.