आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणीतील पक्षासाठी महापालिका प्रचारात उतरले ‘पद्मविभूषण’ शरद पवार (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सांसदीय राजकारणातील कारकीर्दीची पन्नाशी साजरे करणारे, पद्मविभूषण सन्मान प्राप्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर पुण्याच्या महापालिका निवडणूक प्रचारात सहभागी होण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची सद्य:स्थिती आणि वक्त्यांच्या कमतरतेमुळे पवारांना प्रचारात उतरावे लागत आहे.  

‘राष्ट्रवादी’चे दिग्गज नेते दिवंगत आर. आर. पाटील, तुरुंगवासी छगन भुजबळ तसेच जयंत पाटील, अरुण गुजराथी यासारख्या वक्त्यांची उणीव पक्षाला जाणवत आहे. इतर प्रमुख महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही आताच होत असल्याने पक्षाचे बडे नेते आपापल्या शहरात-जिल्ह्यात अडकले आहेत. अजित पवारांनी पुण्याच्या ग्रामीण भागावर आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच २०१२ च्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात फारसे मैदानात न उतरलेल्या पवारांनी यंदा मात्र प्रचारात सहभागी होण्याचे ठरवले आहे. येत्या दोन दिवसांत पवार पुण्यात दोन आणि ठाण्यात एक प्रचारसभा घेणार असल्याचे सांगण्यात आले.  

सन १९९९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यानंतर २००२ च्या पुणे महापालिकेच्या निवडणूक प्रचारात शरद पवार उतरले नव्हते. मात्र २००७ मध्ये त्यांनी पुण्यात प्रभावी प्रचार केला. कॉंग्रेस नेते सुरेश कलमाडी यांच्या अधिपत्याखाली असणारी पुणे महापालिका जिंकण्यासाठी त्या वेळी पवारांनी प्रयत्न केले होते. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात ‘कारभारी बदला’ अशी हाकही त्यांनी दिली हाेती. त्यास पुणेकरांनी प्रतिसाद दिल्याने ‘राष्ट्रवादी’च्या  नगरसेवकांची संख्या २२ वरून थेट ५१ वर पोहोचली. कलमाडी यांचे पुण्यावरचे एकहाती वर्चस्व पवारांच्या प्रचारानंतर संपले होते.  

यंदा पवारांनी चार सभा घेण्याचे नियोजन केले होते. मात्र नव्या नियोजनाप्रमाणे दोन सभा त्यांनी रद्द केल्या आहेत. आता केवळ वडगाव शेरी आणि हडपसर या भागात त्यांच्या सभा होतील. कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट, पर्वती या भाजपला अनुकूल असलेल्या भागात सभा घेण्याचे पवारांनी टाळल्याचे दिसते. पुण्याच्या उपनगरांमधून राष्ट्रवादीला चांगले यश मिळत असल्याचा अनुभव असल्याने पवारांनीही याच भागात जोर लावण्याचे निश्चित केले आहे. महापालिकेच्या आजवरच्या निवडणुकांमध्ये याच भागांमधून राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. या तुलनेने सुरक्षित भागातली ताकद कायम राखण्यावर पवारांनी भर दिला आहे.  

पवार यांच्या महापालिका निवडणुकीतल्या प्रचारावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. नानासाहेब गोरे यांनी खासदारकीची टर्म संपल्यानंतर चक्क स्वतःच पुणे महापालिकेची निवडणूक लढवली होती. नगरसेवक असताना आमदार म्हणून निवडून गेल्यानंतरही नगरसेवकपदाचा राजीनामा न दिल्याची पुण्यात अनेक उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर पवारांनी नुसता प्रचार केला तर काय बिघडले, असा युक्तिवाद ‘राष्ट्रवादी’कडून केला जात आहे. राष्ट्रीय नेते असलेल्या  व पंचाहत्तर वर्षे ओलांडलेल्या पवारांना महापालिका प्रचारात उतरण्याची वेळ यावी हे ‘राष्ट्रवादी’च्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचे अपयश आहे, अशी टीका विराेधक करत अाहेत. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे याही शेवटच्या टप्प्यात पुण्यात प्रचार करणार आहेत.  
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, निरर्थक आक्षेप.....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...