(छायाचित्र : आज सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे माळीनगर पहिले उभे रिंगन मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने पार पाडले.)
पुणे- अवघ्या महाराष्ट्राचा उत्सव ठरणारा पालखी सोहळा आता अंतिम टप्प्यात आला आहे. संत ज्ञानेश्वरमहाराजांची पालखी आज सकाळी खुडूस (ता. माळशिरस) येथून रिंगण करून वेळापूरकडे मार्गस्थ झाली. तर, संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूजहून माळीनगर, श्रीपूरकडे मार्गस्थ झाली.
दरम्यान, अनेक वर्षे मागणी करूनही महाराष्ट्रात गो-हत्या प्रतिबंधक कायदा लागू करीत नसल्याने वारक-यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या चार दिवसात म्हणजेच आषाढी एकादशीपूर्वी गोहत्या प्रतिबंधक कायदा मंजूर न केला गेल्यास मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलपूजा करू देणार नाही, असा इशारा वारकरी संघटनेचे नेते बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे.
आषाढी एकादशीसाठी राज्यातील कानाकोप-यातून व देश-विदेशातून भक्त पंढरपूरात दाखल होत आहेत. काही पोचले आहेत काही पोहचत आहेत. मंगळवारी व बुधवारी आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूरात वारकरी समुदायाचा प्रचंड मेळा भरतो. पंढरपूरात विविध 12 पालख्या पंढरपूराच्या जवळ पोहचल्या आहेत. सोमवारी सर्व पालख्या वाखरी येथे एकमेंकांना भेटतील व मंगळवारी व बुधवारी विठ्ठलाच्या भेटीला मुख्य शहरात दाखल होतील. आज आणि उद्या शनिवार आणि रविवार असल्याने अनेक भक्त पंढरपूरात दाखल होऊन दर्शन घेतील. यंदा पंढरपूरात आषाढीनिमित्त किमान 10-12 लाख भाविक येतील असे प्रशासनाला वाटत आहे. संत ज्ञानेश्वरांची पालखीचा मुक्काम आज पंढरपूरजवळील वेळापूर येथे असेल तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम श्रीपूर- बोरगाव येथे असेल.
दरम्यान, शुक्रवारी संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे गोल रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले. अकलूज (ता. माळशिरस) येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत तोफांच्या सलामीने केले व त्यानंतर दिमाखात गोल रिंगण पार पडले. सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या गोल रिंगण सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
पुढे पाहूया दोन्ही पालखीच्या गोल रिंगण सोहळ्याची छायाचित्रे... ( सर्व छायाचित्रांचा स्त्रोत फेसबुकदिंडी पेज)