आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचतंत्रातील कथाशय ‘भरतनाट्यम’ने साकारणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भरतनाट्यम ही अत्यंत लवचीक नृत्यकला आहे. पारंपरिक सादरीकरणासोबत भरतनाट्यम नृत्याचे शास्त्रोक्त स्वरूप जपून वेगळा कथाशय मांडण्याचा प्रयत्न आता करणार आहे. त्यासाठी पंचतंत्रातील पशुपक्ष्यांच्या कथांचे माध्यम निवडले आहे, अशी माहिती ज्येष्ठ भरतनाट्यम कलावंत आणि नृत्यगुरू व्ही. पी. धनंजयन आणि त्यांच्या पत्नी नृत्यांगना शांताक्का यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

तब्बल 14 वर्षांनंतर धनंजयन पती-पत्नी पुण्यात सादरीकरणासाठी आले होते. यानिमित्ताने नृत्यकला, सादरीकरण आणि नृत्याचे भवितव्य अशा विषयांवर त्यांच्याशी संवाद रंगला. ‘नृत्यकला ही आमची पूजा आहे. ते सर्वस्व आहे. 40 वर्षांहून अधिक काळ नृत्य करत असूनही साधनेचा नेमका कुठला टप्पा आपण गाठला, हे उमगत नाही. कलावंत म्हणून नृत्याचा शोध सुरूच आहे’, असे ते म्हणाले.

आरोप अर्धसत्य
नृत्यावर त्यातही भरतनाट्यम नृत्यावर केवळ पारंपरिक विषयांच्या सादरीकरणाचा आरोप सातत्याने केला जातो, याविषयी ते म्हणाले, या आरोपात अर्धतथ्य आहे, असे मी म्हणेन. तथ्य अशासाठी की वरवर पाहता आरोप खरा आहे. नृत्यात प्रामुख्याने रामायण, महाभारत, भागवत तसेच दक्षिणेकडील लोककथा किंवा प्राचीन भारतीय संस्कृत साहित्यकृती यांवरील आविष्कार दिसतो. पण हे तथ्य अर्धवट अशासाठी आहे, कारण प्रत्येक वेळी आशय वेगळा असतो. प्रेक्षक तो समजून घेत नाहीत किंवा संबंधित कलाकार तो पोचवण्यात कुठेतरी कमी पडतो.

पंचतंत्रातील कथा करणार
आम्हीही बहुधा पारंपरिक विषय निवडतो, पण आता भरतनाट्यमची मूलतत्त्वे जपून आम्ही पंचतंत्रातील काही कथांचे नृत्यात्म सादरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरवातीला पंचतंत्रातील पाच कथा निवडल्या. या छोट्या कथांमधून महत्त्वाची जीवनसत्ये अधोरेखित केलेली दिसतात. ती आजही अबाधित आहेत, हे दर्शवण्याचा आमचा प्रयत्न असेल.

युवा कलावंत प्रिय
नव्या कलावंतांविषयी अनेक बुजुर्ग नापसंतीने बोलतात. मात्र मला युवा कलावंत प्रिय वाटतात कारण त्यांच्याजवळ प्रचंड ऊर्जा, उत्साह, नव्याचा स्वीकार करण्याची वृत्ती आहे. विषयाचे महत्त्व पटले की ते हवी तेवढी मेहनत करायलाही तयार असतात. अगदी कलाप्रांतात करिअर करण्याचीही त्यांची तयारी असते. युवा मने बुजुर्गांपेक्षा वेगळ्या दिशेने विचार करतात. हे इनोव्हेशन कलेचे प्राणतत्त्व असते. आता नव्या काळानुसार त्यांच्यापाशी वेळेची जरा कमी असते, पण ती आपण समजून घेतली पाहिजे आणि योग्य तो मार्ग काढला पाहिजे, असे शांताक्का धनंजयन म्हणाल्या.