आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंढरीमाहात्म्य सांगणारी हस्तलिखिते अभ्यासकांच्या प्रतीक्षेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - विविध भाषा, लिपी, संदर्भ यांनी युक्त असणारी पंढरीमाहात्म्याची तब्बल पंधरा हस्तलिखिते अभ्यासकांची वाट पाहत केंद्रात पडून आहेत. जगातली अनन्यस्वरूपाची वारीची परंपरा, पंढरीचे महत्त्व यांची उकल करण्याची क्षमता या हस्तलिखितांच्या पानापानात दडली आहे. मात्र अभ्यासकांच्या दुर्लक्षामुळे हा महत्त्वाचा ठेवा वंचित स्वरूपात पडून आहे. ही सर्व हस्तलिखिते संकलित स्वरूपात प्रकाशित करण्याची गरज आहे.

मराठी हस्तलिखित सूची केंद्रामध्ये ही हस्तलिखिते जतन केली आहेत. मात्र त्यांचा अभ्यास करण्यासाठी कुणीच पुढे येत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. संस्कृत, मराठी, कन्नड, तेलुगू, तामिळ अशा विविध भाषांमध्ये ही हस्तलिखिते आहेत. त्यापैकी काहींची मराठी संस्करणेही उपलब्ध आहेत. प्रामुख्याने ओवी वृत्तात ती लिहिली गेली आहेत, तर काही दिंडी वृत्तात आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात येथे ती लिहिली गेली आहेत तसेच मिळवली गेली आहेत. त्यापैकी संस्कृत भाषेत 3, कन्नड, तामिळ, तेलुगू भाषांत प्रत्येकी एक हस्तलिखित उपलब्ध आहे. उर्वरित हस्तलिखिते मराठीत आहेत.
संस्कृतमधील हस्तलिखितांना प्रामुख्याने स्कंदपुराण, पद्मपुराण व विष्णुपुराणाचा आधार आहे. या हस्तलिखितांपैकी बाळकव्यासकृत पंढरीमाहात्म्य हे आकाराने सर्वात मोठे आहे. त्यात 12 अध्याय असून 3960 ओव्या आहेत. याउलट हरी दीक्षितकृत तसेच गिरिधरकवीकृत पंढरी माहात्म्याची अनुक्रमे सात व आठच पाने उपलब्ध असून ती अपूर्ण स्वरूपात आहेत.

महत्त्व नेमके काय ?
० पंढरीचा, श्रीविठ्ठल या दैवताचा आणि वारीच्या परंपरेचा मागोवा घेण्यास उपयुक्त
० पौराणिक, ऐतिहासिक, भौगोलिक, भाषिक संदर्भांनी युक्त
० वारीचे सर्वसमावेशक स्वरूप कसे घडत गेले, याचा मागोवा
० वारी, पंढरी आणि विठ्ठलभक्तीचा प्रसार व प्रभाव समजतो

चिकित्सक आवृत्तीची गरज
पंढरीमाहात्म्य सांगणार्‍या या सर्व हस्तलिखितांच्या प्रती उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच हस्तलिखितांचे संकलन प्रकाशित होणे आवश्यक आहे. हस्तलिखितांचा तुलनात्मक अभ्यास करून चिकित्सक आवृत्ती काढण्याची गरज असून पीएचडीसाठी ती उपलब्ध केली पाहिजेत.
वा. ल. मंजूळ, संतसाहित्य अभ्यासक, ‘भांडारकर’चे माजी ग्रंथपाल व मराठी हस्तलिखित सूची केंद्राचे प्रमुख.

अशी आहेत हस्तलिखिते
गोपाळ बोधाकृत माहात्म्य
(5 अध्याय, 600 ओव्या)
बाळकव्यासकृत (12 अध्याय, 3960 ओव्या)
कन्नड कवी गुरुदास (360 ओव्या)
अनंतदेवकृत (12 अध्याय)
रुद्रसुतविरचित (230 ओव्या)
प्रल्हादबुवा बडवेकृत (179 ओव्या)
तेनालीरामकृत माहात्म्य
श्रीधर नाजरेकरकृत (29 अध्याय)
तामिळनाडूतील हस्तलिखित
बालमुकुंदकेसरीकृत
महीपतीकृत ३ संत नामदेवकृत
दत्तवरद विठ्ठल माहात्म्य (12 अध्याय 1460 ओव्या)
हरी दीक्षितकृत (सात पाने -अपूर्ण)
गिरिधरकवीकृत (आठ पाने -अपूर्ण)