पुणे - पंढरीचे, वारीचे आणि श्री विठ्ठलाचे माहात्म्य वर्णन करणारी लिखित, मुद्रित व वाङ्मयीन साधने दुर्लक्षितच आहेत. त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र पंढरपूरमधील पुरातत्त्वीय साधनेही पुरेशी अभ्यासली गेलेली नाहीत. मंदिर व परिसरातील मूर्तीवैविध्य, वीरगळ, शिलालेख हे सारे महत्त्वपूर्ण संदर्भ आणि पुरावे केवळ अनास्था आणि दुर्लक्षामुळे कायमचे नष्ट होत आहेत. वेळीच कृती न केल्यास उर्वरित पुरातत्त्वीय पुरावेही लुप्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे लक्षावधी वारकर्यांचा मेळा जमतो. वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे शतकानुशतकांपासून पंढरपूर येथे वारी, श्रीविठ्ठल आणि पंढरपूर यांच्याविषयीचे अनेक पुरातत्त्वीय अवशेष उपलब्ध होते. काळाच्या ओघात त्यातील काही नष्ट झाले; पण बहुतेक अवशेष मानवी अनास्था, दुर्लक्ष आणि स्वार्थीपणाला बळी पडले आहेत.
शिलालेख नष्ट
पंढरपूरसंदर्भातील काही महत्त्वाचे शिलालेख काही वर्षांपूर्वी अभ्यासकांना प्रत्यक्ष पाहता येत होते. ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे, पुरातत्त्वज्ञ डॉ. शोभना गोखले, डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी अभ्यास करून त्यावर विस्तृत लेखन केले आहे. मात्र, नवी बांधकामे, अनास्था यामुळे हे शिलालेख नष्ट झाले आहेत. चौफाळ्याकडे जाण्याच्या मार्गावरील ताकपिठ्या विठोबा मंदिरातही एक प्राचीन मूर्ती व शिलालेख होता. लखुबाई मंदिराच्या पायर्यांवर एका शिळेवरही शिलालेख होता. तोही आता नाही. चोखोबा समाधीमागच्या घरातही पंढरपूरचे प्राचीन नाव पांढरीपूर होते तसेच दक्षिणद्वारावती असाही उल्लेख असलेला शिलालेख आज अस्तित्वात नाही. सटवाई मंदिरात एक वीरगळ होता. त्याचाही मागमूस नाही. फक्त रेणुकामाता मंदिरात चार पॅनलचा पाच फुटी वीरगळ पाहता येतो.
अन्य सर्व अवशेष नष्टप्राय अवस्थेत असून बहुतेक नाहीसे झाले आहेत.
संदर्भही लुप्तप्राय
पुरातत्त्वीय अवशेषांचे, हस्तलिखितांचे व स्थापत्याचे संदर्भ अभ्यासासाठी महत्त्वाचे असतात. त्या प्रत्येक अवशेषात, स्थापत्यरचनेत, मूर्तींमध्ये, शिलालेखांमध्ये महत्त्वपूर्ण माहितीची, रचनेची, त्यामागील कारणांची नोंद असते. त्यातून प्राचीन, ऐतिहासिक काळावर नवा प्रकाश पडणे शक्य होते. पण पंढरपूरमधील अनेक पुरातत्त्वीय साधने नष्ट झाल्याने अभ्यासकांना साधनेच उपलब्ध नाहीत, अशी अवस्था आहे. याशिवाय प्राचीन ठेवा नाहीसा झाल्याची खंत आहेच.
वा. ल. मंजूळ, संतसाहित्याचे अभ्यासक