आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीत संतपीठ स्थापनेच्या घोषणा हवेत विरल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महाराष्ट्रातील संत विचारांचे प्रतीक असणार्‍या पंढरपूर येथे संतपीठ निर्माण करावे, असा कायदा करून 40 वर्षे उलटली. मात्र, संतपीठ अद्याप कागदावरच आहे. गेल्या 40 वर्षांत अनेक समित्या, न्यायालयीन वाद, चर्चेची गु््ºहाळे झाली. पण संतपीठ प्रत्यक्षात येऊ शकलेले नाही. राज्य सरकारने संतपीठ स्थापन करण्याबाबत गांभीर्याने लक्ष घालून कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी लक्षावधी वारकरी आणि संत अभ्यासकांकडून होत आहे.

पंढरपूर टेंपल अ‍ॅक्टनुसार राज्य सरकारने पंढरपूर येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्थापन करावे, असा स्पष्ट उल्लेख आहे. कायद्यातच उल्लेख असल्याने त्या त्या वेळच्या राज्य सरकारची संतपीठ स्थापन करण्याची जबाबदारी केवळ टोलवाटोलवी, वाद, स्थान या मुद्द्यांवरच अडकून पडली आहे. संतपीठाचे हे भिजत घोंगडे 40 वर्षांनतरही तसेच आहे. मध्यंतरी संतपीठ पैठणला उभारण्याची योजना आली होती. मात्र नियोजित जागा वन विभागाची असल्याने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नकारघंटा वाजवली होती. पैठणमध्ये प्रारंभिक टप्प्यात एका इमारतीचे बांधकामही करण्यात आले. तसेच एका व्यक्तीची नेमणूकही करण्यात आली. पण प्रत्यक्षात संतपीठ अस्तित्वात आलेच नाही.

राज्य शासनाने याप्रकरणी फक्त अस्थायी स्वरूपाच्या समित्या नेमण्याचा सपाटा लावला. आजही अशीच अस्थायी समिती कागदावर अस्तित्वात आहे. संतपीठ स्थापन व्हावे, यासाठी समितीत दीर्घकाळ कार्यरत असणारे सदस्य अ‍ॅड. शशिकांत पागे म्हणाले, समितीत बाळासाहेब भारदे, डॉ. यू. म. पठाण, डॉ. निर्मलकुमार फडकुले, राम शेवाळकर, डॉ. सदानंद मोरे, उल्हास पवार आदी मान्यवरांचा समावेश होता. यासंदर्भात समिती सदस्यांनी नियोजित संतपीठाचे एक सादरीकरणही केले होते. संतपीठ हे तत्त्वविचारांचा अभ्यास करणार्‍यांसाठी हक्काचे ठिकाण बनावे, संतांनी सांगितलेला समतेचा, बंधुतेचा विचार सर्वत्र पोहोचावा, सर्व संतांच्या साहित्याचा एकत्रित अभ्यास करता यावा, सेवा आणि भक्तिभावाचा जागर मनामनांत व्हावा, असा उद्देश यामागे होता. मात्र वर्षानुवर्षे उलटूनही संतपीठ अद्याप प्रत्यक्षात अवतरले नाही.

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणाले, संतपीठ स्थापन करावे, असे कायद्यात स्पष्ट निर्देश आहेत. पण संतपीठ 40 वर्षांनंतरही वास्तवात आलेले नाही, याचा खेद वाटतो. आपणच केलेला कायदा सरकार पाळत नाही, असाच याचा अर्थ आहे. सरकारने आपले कायदे आणि आपल्या कृती, यात ताळमेळ ठेवला पाहिजे, इतकेच मला वाटते.

पंढरपूर येथेच स्थापना हवी
पंढरपूर येथेच संतपीठाची स्थापना करावी, असे कायद्यात म्हटले आहे. त्यामुळे पंढरपूर येथेच ते स्थापन करावे. त्याआधी राज्य सरकारने यासंबंधीच्या अस्थायी समित्यांऐवजी पूर्णवेळ स्थायी स्वरूपाची समिती स्थापन करून कायद्याची अंमलबजावणी करावी. - डॉ. सदानंद मोरे, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व समिती सदस्य

(फोटो - संग्रहित छायाचित्र)