आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: लक्षावधींचा वैष्णवमेळा पुण्यनगरीत दाखल, दोन दिवस मुक्काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे-टाळ-वीणा-चिपळ्या-मृदंगांचाघोष, निनादणाऱ्या तुतारी, चौघडे, नगारखान्यावरील वाद्यांचे मंगल सूर, ओवी-अभंगांची संगीतमय पार्श्वभूमी आणि या साऱ्यांच्या सोबतीला वरुणराजाच्या सरी.. अशा आल्हाददायक वातावरणात बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन झाले. बुधवार आणि गुरुवारी दोन्ही पालख्यांचा मुक्काम असून शुक्रवारी सकाळी पालख्यांचे पुढील प्रस्थान होणार आहे.

दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी संचेती चौकापासून दुतर्फा गर्दी झाली होती. शहरातील विविध संस्था आणि कार्यकर्त्यांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. मनपाच्या वतीने प्रत्येक चौकात स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. माउलींच्या पालखी सोहळ्यातील ४२७ तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील ३३० अशा सुमारे साडेसातशे दिंड्यांच्या एकत्रित आगमनाने पुण्याचे वातावरण भक्तिमय झाले आहे. माउलींच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात, तर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील विठ्ठल मंदिरात राहणार आहे.

बोपोडीमार्गे तुकोबांची पालखी, तर विश्रांतवाडीमार्गे माउलींची पालखी पाटील इस्टेट (संचेती चौकाजवळ) येथे सायंकाळी पोहोचल्या आणि लक्षावधी कंठांतून ‘माउली माउली, तुकोबा माउली’ असा जयघोष झाला. फुलांच्या पाकळ्यांची उधळण झाली. माउलींच्या पालखी रथासमोर असणाऱ्या मानाच्या अश्वाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. पुढे फर्ग्युसन कॉलेज रोड, डेक्कन परिसर आणि लक्ष्मी रोडवरही गर्दीने रस्ते दुतर्फा फुलून गेले होते.

पालखी रथाचे चाक पंक्चर
आजोळघरचामुक्काम आटोपून माउलींचा पालखी सोहळा बुधवारी अाळंदीहून वेळेत निघाला. मात्र, वाटेत दिघी येथे रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी रथाचे एक चाक पंक्चर झाले. त्यामुळे पालखी सोहळा थांबवावा लागला. रथ मोकळा करून, बाजूला घेऊन, चाकाची दुरुस्ती होईपर्यंत साहजिकच वेळ गेला. परिणामी पालखी सोहळा पुण्यात पोहोचण्यास सुमारे सव्वा ते दीड तास उशीर झाला. ‘सोहळ्याच्या आधी रथाची चारही चाके आणि स्टेपनी नवीन खरेदी केली होती. पण रस्ता फारच दुरवस्थेत असल्याने चाकाची समस्या उद्भवली असावी,’ असे माउली देवस्थान प्रमुख विश्वस्त अजित कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या पालख्या शहरात दाखल हाेताच दर्शन घेण्यासाठी पुण्याच्या रस्त्यांवर असा जनसागर लाेटला हाेता.
पुण्‍यात दोन दिवस मुक्‍काम..
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे महापालिकेच्या हद्दीत म्‍हणजे कळसगाव, मस्के वस्ती येथे सकाळी अकराच्या सुमारस दाखल होणार होती. पण चाक पंक्चर झाल्याने या सोहळ्यास पुणे मनपाच्‍या हद्दीत दाखल होण्यास उशीर लागण्याची शक्यता आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज व तुकोबांची पालखी पुण्यनगरीत आल्यानंतर या दोन्ही पालख्या बुधवार व गुरुवार असे दोन दिवस पुण्‍यात मुक्‍कामी असतील.

पुण्यनगरीत शेकडो दिंड्यांचे आगमन..
संत ज्ञानोबा माऊली व तुकोबाराय यांच्‍या भेटीच्‍या आगळ्यावेगळ्या सोहळ्याच्‍या भक्‍तीरसात पुणेकर दरवर्षी न्‍हाऊन निघतात. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून वारकरी पुण्यात दाखल झाले आहेत. वारकरी व दिंड्यांच्‍या सोईसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. ठिकठिकाणी राहण्यासाठी सोय करण्यासाठी आली. पालखीच्‍या काळात गर्दी होऊ नये यासाठी विशेष सेन्‍सचा वापर करण्‍यात येणार आहे.
या बातम्‍याही वाचा..
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, पालखी सोहळ्यातील सुंदर फोटो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...